श्रीनगरला विमानतळावरच राहुल गांधींना रोखलं, दिल्लीला परत धाडलं
राहुल गांधी यांच्यासहीत गुलाब नबी आझाद, आनंद शर्मा, शरद यादव अशी नेत्यांची फळी होती
श्रीनगर : काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचं एक प्रतिनिधीमंडळ जम्मू-काश्मीरची राजधानी श्रीनगरला दाखल झालं. विमानतळावर दाखल झालेल्या राहुल गांधी यांना अडवल्यामुळे विमानतळावरच मोठा हंगामा पाहायला मिळाला. त्यांना श्रीनगर विमानतळाहून बाहेर पडण्यास मनाई करण्यात आली. त्यानंतर राहुल गांधींसहीत काँग्रेसच्या ११ नेत्यांना परत दिल्लीत पाठवून देण्यात आलं.
राहुल गांधी यांच्यासहीत गुलाब नबी आझाद, आनंद शर्मा, शरद यादव अशी नेत्यांची फळी 'विस्तारा' एअरलाईननं श्रीनगरला दाखल झाली होती. जम्मू-काश्मीरमधून अनुच्छेद ३७० हटवण्यात आल्यानंतर सध्या तिथली परिस्थिती प्रत्यक्ष जाणून घेण्यासाठी काँग्रेस नेते दिल्लीहून श्रीनगरला गेले होते. इथं मीडियालाही या नेत्यांची मुलाखत किंवा भेट घेण्यास मनाई करण्यात आली.
राहुल गांधी आणि काँग्रेस नेत्यांना अडवण्याच्या आणि स्थानिकांची भेट न घेऊ देण्यासाठी राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी सरकारवर निशाणा साधला. 'केंद्र सरकारनं विरोधी पक्षाच्या नेत्यांना श्रीनगरमध्ये जाऊ द्यायला हवं होतं, यामुळे जनतेत त्यांच्याबद्दल विश्वास वाढला असता' असं त्यांनी म्हटलंय.