लोकसभा निवडणुकीत (LokSabha Election) भाजपा नेत्या स्मृती इराणी (Smriti Irani) यांना अमेठीतून (Amethi) पराभवाचा सामना करावा लागला. यानंतर स्मृती इराणी यांनी आपला सरकारी बंगला रिकामी केला आहे. गुरुवारी अधिकाऱ्यांनी याची माहिती दिली होती. दरम्यान सरकारी बंगला रिकामी केल्यानंतर सोशल मीडियावरुन स्मृती इराणी यांना लक्ष्य केलं जात आहे. यानंतर राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी स्मृती इराणी यांचा बचाव करणारी पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राहुल गांधी यांनी स्मृती इराणी यांच्यासाठी शेअर केलेल्या पोस्टमध्ये लिहिलं आहे की, "आयुष्यात विजय-पराभव होत असतो. मी सर्वांना आवाहन करतो की, स्मृती इराणी किंवा कोणत्याही नेत्यासाठी अपमानास्पद भाषेचा वापर किंवा चुकीची वागणूक टाळा. एखाद्याला कमी लेखणं आणि अपमान करणं हे ताकद नव्हे तर दुबळं असल्याचं लक्षण आहे".



अमित मालवीय यांनी साधला निशाणा


राहुल गांधी यांच्या पोस्टवर भाजपाचे आयटी सेलचे प्रमुक अमित मालवीय यांनी लिहिलं आहे की, "हा आजवरचा सर्वात कपटी संदेश आहे. अमेठीत ज्या महिलेने त्यांचा पराभव केला आणि त्यांचा अहंकार चिरडून टाकला त्या महिलेवर लांडग्यांच्या टोळ्याप्रमाणे काँग्रेस नेत्यांना सोडल्यानंतर, हे फार चांगलं आहे. कितीही बडबड केली तरी स्मृती इराणींनी बालबुद्धीला अमेठीचा त्याग करण्यास भाग पाडले ही वस्तुस्थिती दूर होत नाही".




1.5 लाखांपेक्षा अधिक मतांनी पराभव


काँग्रेस नेते किशोरी लाल शर्मा यांनी अमेठीतून स्मृती इराणी यांचा पराभव केला. 1.5 लाख मतांच्या फरकाने ते विजयी झाले. याआधी 2019 मध्ये स्मृती इराणी यांनी अमेठीतून राहुल गांधी यांचा पराभव केला होता. 


बंगला रिकामी करण्यासाठी 11 जुलैची डेडलाईन


स्मृती इराणी यांनी दिल्लीमधील आपला सरकारी बंगला रिकामी केला आहे. या आठवड्याच्या सुरुवातीलाच त्यांनी हा बंगला रिकामी केला. लोकसभा निवडणुकीत मोदी सरकार 2.0 मधील 17 मंत्र्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. मंत्र्यांना बंगले रिकामी कऱण्यासाठी 11 जुलैपर्यंत वेळ देण्यात आली होती. यासंबंधी त्यांना नोटीसही जारी करण्यात आली होती.