बंगळुरु : कर्नाटकमध्ये सध्या प्रचाराच्या रणधुमाळी सुरु आहे. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांच्या विमानाचा अपघात होता होता टळलाय. याप्रकरणी काँग्रेसने चौकशीची मागणी केलीय. गुरुवारी राहुल गांधी एका विशेष विमानानं दिल्लीहून हुबळीला पोहचेल. विमान जमीनीवर उतरत असताना त्यात तांत्रिक बिघाड निर्माण झाला. पण हा तांत्रिक बिघाड नसून त्यामागे घातपाताची शंका काँग्रेसनं व्यक्त केलीय. याप्रकरणी डीजीसीए मार्फत चौकशी व्हावी यासाठी पायलटविरोधात तक्रार दाखल करण्यात आलीय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राहुल गांधींबरोबर विशेष विमानात प्रवास करणाऱ्या विद्यार्थ्यांनंही कर्नाटक पोलीस महासंचालकांकडे आणि महा निरिक्षकांना याप्रकरणी चौकशी करण्याची मागणी केलीय. विद्यार्थ्यानं दिलेल्या तक्रारीत विमान उतरतेवेळी हवामान स्वच्छ होतं. याप्रकरणी डीजीसीएनं चौकशीचे आदेश दिले आहेत.


मात्र राहुल गांधी यांच्या कार्यालयाने गुरुवारी रात्री हुबळी पोलिसांत तक्रार नोंदविल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. हा घातपाताचाही प्रयत्न असू शकतो, असे तक्रारीत नमूद केले आहे. राहुल गांधी  विधानसभा निवडणूक प्रचारासाठी कर्नाटक दौर्‍यावर आहेत. गुरुवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास ते दिल्लीवरून विमानाने निघाले.



साडेअकराच्या सुमारास त्यांच्या विमानाने हुबळी गाठली. मात्र दोनदा प्रयत्न करूनही  विमान हुबळी विमानतळावर उतरू शकले नाही. विमानाची ऑटो पायलट सुविधा निष्क्रिय झाली होती. शिवाय विमान हवेतच अस्थिर बनले होते. शेवटी तिसर्‍या प्रयत्नात विमान धावपट्टीवर सुखरूप उतरले.