हिमाचल प्रदेशात काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. पक्षाचे नेते विक्रमादित्य सिंग यांनी पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. पत्रकार परिषदेत घेत त्यांनी आपण राजीनामा देत असल्याची घोषणा केली. यावेळी त्यांना आपल्या भावना अनावर झाल्या होत्या, सुखविंदर सिंग सुखू सरकारने आपले दिवंगत वडील वीरभद्र सिंग यांचा अनादर केल्याचा आरोप यावेळी त्यांनी केला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विक्रमादित्य सिंग यांनी काँग्रेसने 2022 ची निवडणूक सर्वात मोठे नेते आणि सहा वेळा मुख्यमंत्रीपद भूषवणारे वीरभद्र सिंग यांच्या नावे लढण्यात आली होती याची आठवण करुन दिली. "कोणताही बॅनर किंवा पोस्टर नव्हता ज्यावर त्यांचा फोटो नव्हता. निवडणुकीच्या आदल्या दिवशी वृत्तपत्रात पानभर मोठा फोटो आणि संदेश देण्यात आला होता. मला लक्षात ठेवा, मत द्या असं या संदेशात लिहिलं होतं. हे रेकॉर्डवर आहे," असं त्यांनी सांगितलं.


त्यानंतर त्यांनी अखेरचा मुघल सम्राट बहादूर शाह जफर यांनी रंगूनला इंग्रजांनी निर्वासित केल्याबद्दल दुःख व्यक्त करण्यासाठी लिहिलेल्या ओळी बोलून दाखवल्या, जिथे त्यांचा नंतर मृत्यू झाला. "कितना है बदनसीब जफर दफन के लिए, दो गज़ जमीन भी ना मिली कू-ए-यार में (जफर किती दुर्दैवी आहे की त्याला  दफन करण्यासाठी प्रिय जमिनीचा एक तुकडा मिळाला नाही). यामध्ये जफर त्यांच्या जन्मभूमीचा संदर्भ देत होता.


"ज्यांच्या नावे सरकार स्थापन केलं त्यांचा पुतळा उभारण्यासाठी मॉल रोडवर छोटीशी जमीनही यांना मिळाली नाही. हे मी फार जड अंतकरणाने सांगत आहे. या सरकारने माझ्या वडिलांना हा आदर दिला आहे," असा संताप व्यक्त करताना त्यांच्या डोळ्यात पाणी होतं. पुढे ते म्हणाले "आम्ही फार भावनिक लोक आहोत. आम्हाला पदाची चिंता नाही. पण आदर दिला पाहिजे. वारंवार विनंती करुनही ते काम करु शकले नाहीत. हे फार दुर्दैवी आहे. मी राजकीयदृष्ट्या नाही पण भावनिकरित्या फार दुखावलो आहे. हे का झालं याची मला कल्पना नाही. मी पक्ष नेतृत्वाकडेही तक्रार केली होती, पण काहीच झालं नाही. त्यांनी यात लक्ष घातलं पाहिजे. हिमाचलमधील लोक फार भावनिक आहेत. प्रत्येक गोष्टीकडे राजकीय दृष्टीने पाहिलं जाऊ शकत नाही. एक मुलगा म्हणून मला वाईट वाटत असून, पक्ष याची नोंद घेईल अशी आशा आहे," असं ते म्हणाले आहेत.


राज्यसभेच्या एका जागेसाठी झालेल्या निवडणुकीत काँग्रेसच्या सहा आमदारांनी क्रास-व्होट केल्यानंतर हिमाचलमध्ये राजकीय संकट निर्माण झालं आहे. आमदारांना हरियाणाच्या पंचकुलातील एका रिसॉर्टमध्ये नेण्यात आलं आहे. दरम्यान भाजपाने काँग्रेसने सत्तेत राहण्याचा जनादेश गमावला असल्याचा दावा केला आहे. 


68 सदस्यीय विधानसभेत 40 आमदार असलेल्या काँग्रेस पक्षाने आता आणखी नुकसान टाळण्यासाठी ज्येष्ठ नेते भूपिंदरसिंग हुडा आणि डीके शिवकुमार यांना हिमाचलला पाठवलं आहे.