नवी दिल्ली : राज्यातला सत्तास्थापनेचा तिढा आता सुटण्याच्या मार्गावर आहे. राज्यात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांचं महाविकासआघाडीचं सरकार येणार हे आता जवळपास निश्चित झालं आहे. यानंतर आता काँग्रेसमध्ये उपमुख्यमंत्रिपदासाठी जोरदार लॉबिंग सुरु झालं आहे. उपमुख्यमंत्रिपदासाठी प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण या दोन्ही गटांकडून फिल्डिंग लावली जात आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बाळासाहेब थोरातांचं नाव आघाडीवर आहे पण अशोक चव्हाण गटाचे आमदार आक्रमक आहेत. आता श्रेष्ठी कुणाला कौल देणार? याची उत्सुकता आहे. ३३ कॅबिनेट आणि १० राज्यमंत्रीपदापैकी कॅबिनेट मंत्रिपदात समसमान फॉर्म्युलासाठी आग्रही राहण्याचं काँग्रेस हायकमांडने त्यांच्या नेत्यांना सांगितल आहे.


महाशिवआघाडीमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीला उपमुख्यमंत्रिपद आणि शिवसेनेला मुख्यमंत्रीपद मिळणार असल्याचं जवळपास निश्चित झालं आहे. उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री व्हावं यासाठी शरद पवार, राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे नेते आग्राही आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार बाळासाहेब थोरात यांच्या गळ्यात उपमुख्यमंत्रिपदाची माळ पडू शकते, तर अजित पवार यांनाही उपमुख्यमंत्रिपद मिळू शकतं. राष्ट्रवादीला अडीच वर्षं मुख्यमंत्रीपद मिळावं, यासाठी अजित पवार आग्रही असल्याचं समजतंय.


राष्ट्रवादीकडून मंत्रीपदी दिलीप वळसे पाटील, छगन भुजबळ, धनंजय मुंडे, जितेंद्र आव्हाड, हसन मुश्रीफ, अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांच्या नावाची चर्चा आहे. तर काँग्रेसकडून अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, यशोमती ठाकूर, विजय वडेट्टीवार, विश्वजीत कदम, अमित देशमुख, माणिकराव ठाकरे यांची मंत्रीपदी वर्णी लागणयाची चिन्हं आहेत.