नवी दिल्ली: राष्ट्रीय लोकशाही आघाडी (रालोआ) सरकारविरोधात मांडण्यात येणाऱ्या अविश्वास ठरावामुळे संसदेतला शुक्रवारचा दिवस नाट्यमय असा ठरला. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचे प्रभावी भाषण आणि त्यानंतर पंतप्रधान मोदींना मारलेली मिठी यामुळे काँग्रेसच्या बाजूने मोठ्याप्रमाणात वातावरणनिर्मिती झाली. यानंतर आता काँग्रेस आणखी एक मास्टरस्ट्रोक खेळण्याच्या तयारीत असल्याचे समजते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

संसदेतील सर्व राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना अविश्वास ठरावाविषयी मत व्यक्त करण्याची संधी देण्यात आली आहे. मात्र, अनेक खासदारांची भाषणे लांबल्यामुळे रात्रीचे नऊ वाजत आले तरी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे भाषण अद्यापही बाकी आहे. अशा परिस्थितीत काँग्रेसने पंतप्रधानांच्या भाषणापूर्वीच वॉकआऊट करून मोदींचे भाषण प्रभावहीन करण्याची रणनीती आखली आहे. याबाबत काँग्रेसकडून अधिकृत वाच्यता करण्यात आली नसली तरी असे झाल्यास भाजप काय भूमिका घेणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.