जम्मू-काश्मीरमध्ये सरकार बनवण्याचा जोरदार प्रयत्न
भाजपला सह देण्याचा प्रयत्न...
नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरमध्ये सध्या राज्यपाल शासन लागू आहे. सोमवार देशाचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या घरी काँग्रेसच्या सर्व वरिष्ठ नेत्यांची बैठक सुरु आहे. या बैठकीत मनमोहन सिंग यांच्यासह डॉ.कर्ण सिंह, माजी अर्थमंत्री पी चिदंबरम, राज्यसभेचे काँग्रेसचे नेते गुलाम नबी आजाद आणि अंबिका सोनी या देखील सहभागी आहेत. काँग्रेसचे हे सर्व नेते यूपीए अध्यक्षा सोनिया गांधी यांनी काश्मीर मुद्दयावर बनवलेल्या कमिटीचा भाग आहेत. या कमेटीचे चेअरमन डॉ. मनमोहन सिंग आहेत. मनमोहन सिंग यांच्या घरी 11 वाजता ही बैठक होणार असल्याचं सूत्रांचं म्हणणं आहे. या बैठकीत काश्मीरच्या राजकारणावर चर्चा होणार आहे. जम्मू-काश्मीरमध्ये सरकार बनवण्याचा देखील विचार होऊ शकतो.
जम्मू-काश्मीरमध्ये काही दिवसांपूर्वीच भारतीय जनता पक्षाने महबूबा सरकारचा पाठिंबा काढून घेतला होता. यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये राज्यपाल शासन लागू करण्यात आलं होतं. सरकार पडल्यानंतर काँग्रेस आणि पीडीपी यांचं सरकार बनतं का हे आता पहावं लागेल. याआधी गुलाम नबी आजाद यांनी जम्मू-काश्मीरमध्ये पीडीपीसोबत कोणतीही युती होणार नसल्याचं म्हटलं होतं. राज्यसभेत विरोधी पक्षाचे नेते गुलाम नबी आजाद यांनी म्हटलं होतं की, पीडीपीसोबत युतीचा प्रश्नच येत नाही.
मागील 10 वर्षात चौथ्य़ांदा राज्यात केंद्रीय शासन लागू झालं आहे. वोहरा जून 2008 मध्ये जम्मू-काश्मीरचे राज्यपाल झाले होते. 40 वर्षात राज्यात आठव्यांदा राज्यपाल शासन लागू झालं आहे. सध्याच्या विधानसभेचा कार्यकाळ मार्च, 2021 मध्ये संपेल.