आमदाराच्या 16 वर्षाच्या मुलाची स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या, घटनेने खळबळ
काँग्रेसचे आमदाराच्या धाकट्या मुलाने राहत्या घरी स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली.
जबलपूर : बरगी विधानसभेतील काँग्रेसचे आमदार संजय यादव यांच्या धाकट्या मुलाने हातीताल येथील राहत्या घरी दुपारी 4 वाजता स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली. विभोर यादवला उपचारासाठी खाजगी रुग्णालयात आणले असता त्याला मृत घोषित करण्यात आले. विभोर याने स्वतःच्या खोलीत गोळी झाडून घेतल्याचे सांगण्यात येत आहे. विभोर याने सुसाईड नोटही लिहिली आहे. (Congress MLA Sanjay Yadav Son commit suicide)
घटनेची माहिती मिळताच काँग्रेसचे आमदार संजय यादव यांच्यासह माजी मंत्री तरुण भानोत आणि काँग्रेसचे अनेक दिग्गज नेते रुग्णालयाबाहेर पोहोचले. रुग्णालयाबाहेरही मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. ही घटना नेमकी कशामुळे घडली हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. विभोर यादव हे काँग्रेस आमदार संजय यादव यांचा धाकटा मुलगा असल्याचे सांगण्यात येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, विभोर यादव याच्या डोक्यात गोळी लागली आहे. मात्र, विभोर याने हे टोकाचे पाऊल का उचलले हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलिसांना विभोर यादवच्या खोलीतून एक सुसाईड नोटही मिळाली आहे, ज्यामध्ये माझी आई खूप चांगली आहे, माझे वडील खूप चांगले आहेत, असे लिहिले आहे. पोलिसांनी विभोर यादवच्या खोलीला कुलूप लावून तपास सुरू केला आहे.