मोठ्या पराभवानंतर काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची दिल्लीत बैठक
काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक उद्या शनिवारी दिल्लीत होत आहे. या बैठकीत पक्षाच्या पराभवाची कारणमीमांसा आणि चिंतन होणार आहे.
नवी दिल्ली : काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक उद्या शनिवारी दिल्लीत होत आहे. या बैठकीत पक्षाच्या पराभवाची कारणमीमांसा आणि चिंतन होणार आहे. या बैठकीपूर्वी राहुल गांधी काँग्रेस अध्यक्षपद सोडणार का याची चर्चा दिल्लीत सुरू झाली आहे. तर दुसरीकडे राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या राजीनाम्याचीही चर्चा सुरू झाली आहे. संपूर्ण देशात काँग्रेसला केवळ ५१ जागा जिंकता आल्यात तर सहा राज्यांत एकही जागा मिळवता आलेली नाही. त्यामुळे काँग्रेस खूपच बॅकफूटवर फेकली गेली आहे. त्यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये निराशेचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे काँग्रेसला पुन्हा भरारी घ्यावी लागेल, अन्यथा काँग्रेसचे काही खरे नाही, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे.
अशोक गहलोत सध्या दिल्लीत असून ते याबाबत राजस्थानचे प्रभारी अविनाश पांडे यांच्याशी चर्चा करणार आहेत. याबाबत राजस्थानचे प्रभारी आणि काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस अविनाश पांडे यांनी या बैठकीबाबत भाष्य केले आहेत. राजस्थानमध्ये नेतृत्व आणि संघटनेने एकजूट होऊन काम केले. निकाल आमच्या बाजूने का आला नाही, तो चिंतेचा विषय आहे. हा शोधाचा विषय आहे. आम्ही कुठे कमी पडलो त्याचा अभ्यास करु, असे ते म्हणालेत.
दरम्यान, महाराष्ट्र राज्यातही काँग्रेसला केवळ चंद्रपूरचीच जागा जिंकता आली. तसेच महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष अशोक चव्हाण आणि महाराष्ट्राचे प्रभारी नेते मल्लिकाअर्जुन खर्गे यांनाही पराभवाचा सामना करावा लागला. तसेच विरोधी पक्षनेते चक्क भाजपच्या गोठात गेलेत. त्यामुळे राज्यात काँग्रेसला हा मोठा धक्का मानला जात आहे.