भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी काँग्रेसचे केंद्रातील नेतेही आग्रही
राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांचेही स्पष्ट संकेत
मुंबई : महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी काळजीवाहू मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सत्तास्थापनेचे आमंत्रण दिले आहे. त्यामुळे आता विधानसभा निवडणुकीत सर्वात मोठा पक्ष ठरलेला भाजप देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वाखाली सरकार स्थापनेचा दावा करेल. यानंतर भाजप सरकारला सभागृहात बहुमत सिद्ध करावे लागेल. दरम्यान भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी काँग्रेसच्या राज्यातील ज्येष्ठ नेत्यांबरोबरच केंद्र पातळीवरील नेतेही आग्रही आहेत. यासाठी समोर येणारा दुसरा पर्याय स्वीकारण्यास हे नेते सकारात्मक आहेत. काँग्रेस पक्षश्रेष्ठींशी जवळीक असलेले राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनीही तसे स्पष्ट संकेत दिले आहेत.
राज्यातील बहुतांश काँग्रेसचे आमदारही शिवसेनेबरोबर जाण्यास तयार आहेत. आता केवळ सोनिया गांधींच्या होकाराची प्रतिक्षा आहे. तर दुसरीकडे शिवसेनेची भूमिकाही काँग्रेसबरोबर जाण्याबाबत सकारात्मक असल्याचे संकेत आहेत. राष्ट्रवादीची भूमिका तर याबाबत सकारात्मक आहे. भाजपाने सरकार स्थापन केलं तर राष्ट्रवादी काँग्रेस भाजपा विरोधात मतदान करेल असं मलिक यांनी स्पष्ट केलंय.
यापूर्वी २०१४ मध्येही भाजपने अल्पमतातील सरकार स्थापन केले होते. यानंतर सभागृहातील विश्वासदर्शक ठरावाच्यावेळी शिवसेनेने भाजपला पाठिंबा दिला होता. मात्र, यंदा शिवसेनेने मुख्यमंत्रीपदाच्या मागणीवरून ताठऱ भूमिका घेतल्याने भाजपची चांगलीच अडचण झाली आहे. त्यामुळे भाजपने सत्तास्थापनेसाठी पुढाकार घेतला नव्हता. परिणामी महाराष्ट्रातील राजकीय परिस्थितीविषयी अस्पष्टता निर्माण झाली होती. विधानसभेची मुदत संपल्यानंतर महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट होण्याची शक्यताही वर्तविली जात होती.
काळजीवाहू मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी झालेल्या पत्रकारपरिषदेत राज्यात पुन्हा भाजपचेच सरकार येईल, असा दावा केला होता. मात्र, भाजपकडे अवघ्या १०५ आमदारांचे संख्याबळ आहे. त्यामुळे बहुमतासाठी लागणारा १४५ चा आकडा भाजप कसा गाठणार, हा यक्षप्रश्न आहे. कर्नाटक आणि गोव्याप्रमाणे भाजप आमदारांची फोडाफोडी करेल, अशी शक्यताही सुरुवातीला वर्तविण्यात येत होती. मात्र, भाजप कोणतीही फोडाफोडी करणार नाही, असे देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले होते. त्यामुळे आता भाजप राज्यपालांचे निमंत्रण स्वीकारून सत्तास्थापनेचा दावा करणार का?, हे पाहणे रंजक ठरेल.