नवी दिल्ली: राम मंदिराच्या उभारणीत अडथळा आणण्यासाठी काँग्रेस देशात हिंसाचार घडवण्याच्या तयारीत असल्याचा आरोप केंद्रीय मंत्री उमा भारती यांनी केला. त्या गुरुवारी प्रसारमाध्यमांशी बोलत होत्या. यावेळी त्यांनी म्हटले की, काँग्रेसने आम्हाला पाठिंबा दिला तर अयोध्येतील राम मंदिराचा मार्ग मोकळा होऊ शकतो. राम मंदिराच्या उभारणीत कोणता अडथळा असेल तर तो म्हणजे काँग्रेस पक्षाकडून केली जाणारी कारस्थाने. ही कारस्थानं काँग्रेसने थांबवली आणि आम्हाला साथ दिली तर मंदिराची निर्मिती नक्कीच होईल. मात्र, सध्या काँग्रेस राम मंदिराच्या उभारणीत अडथळा आणण्यासाठी हिंसाचार घडवण्याच्या तयारीत आहे, असे उमा भारती यांनी सांगितले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दोन दिवसांपूर्वीच याच मुद्द्यावरून उमा भारती यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना लक्ष्य केले होते. राम मंदिराच्या उभारणीसाठी सकारात्मक वातावरण निर्मितीची गरज आहे. मात्र, राहुल गांधी देशातील वातावरण दुषित करत असल्याचे उमा भारती यांनी म्हटले होते. 



उमा भारती यांनी नुकतीच आगामी लोकसभा निवडणूक लढवणार नसल्याची घोषणा केली होती. मी राजकीय संन्यास घेतलेला नाही. गंगा नदीची स्वच्छता आणि राम मंदिराची निर्मिती यासाठी मी हा निर्णय घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले होते. मकर संक्रांतीच्या मुहूर्तावर केंद्रीय मंत्री उमा भारती या गंगा किनाऱ्यापासून २५ हजार किमीची पायी यात्राही काढणार आहेत.