नवी दिल्ली: काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी अमेठी मतदारसंघात स्मृती इराणी यांच्याकडून पराभव झाल्याचे मान्य केले आहे. ते गुरुवारी संध्याकाळी दिल्लीत झालेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी पत्रकारांनी त्यांना अमेठी मतदारसंघात पिछाडीवर असल्याविषयी विचारण्यात आले. तेव्हा राहुल गांधी यांनी लगेचच आपला पराभव मान्य केला. त्यांनी म्हटले की, मला अमेठीवासियांचा निर्णय मान्य आहे. मी स्मृती इराणी यांना इतकेच सांगू इच्छितो की, त्यांना आता जनतेच्या अपेक्षा पूर्ण कराव्यात. जनतेने त्यांच्यावर दाखवलेला विश्वास सार्थ ठरवावा, असे राहुल गांधी म्हटले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लोकसभा निवडणुकीच्या गुरुवारी जाहीर झालेल्या निकालांमध्ये भाजपप्रणित एनडीएने ५४३ लोकसभा मतदारसंघांपैकी ३०० पेक्षा अधिक जागांवर विजयी आघाडी घेतली आहे. तर काँग्रेसप्रणित संयुक्त पुरोगामी आघाडीला (यूपीए) १०० पेक्षा कमी जागा मिळण्याची शक्यता आहे.



याविषयी बोलताना राहुल गांधी यांनी म्हटले की, जनता मालक आहे, हे मी पहिल्यापासूनच सांगत होतो. त्यामुळे मला हा निर्णय मान्य आहे. मी या विजयाबद्दल भाजपचे अभिनंदन करतो. मला आज या पराभवाची चिकित्सा करायची नाही. त्यासाठी बराच वेळ मिळेल. तसेच मी या पराभवाची संपूर्ण जबाबदारी स्वीकारत असल्याचेही राहुल यांनी सांगितले.