VIDEO:अमित शहा खून प्रकरणातील आरोपी; राहुल गांधींची जळजळीत टीका
जय शहा म्हणजे जादूगर आहे.
जबलपूर: भाजपने साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांना भोपाळमधून लोकसभेची उमेदवारी दिल्यानंतर मध्य प्रदेशातील प्रचाराचे वातावरण चांगलेच तापले आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी मंगळवारी जबलपूर येथे सभा घेतली. या सभेत राहुल गांधी यांनी भाजपाध्यक्ष अमित शहा आणि त्यांचा मुलगा जय शहा यांच्यावर तिखट शब्दांमध्ये टीका केली. यावेळी राहुल यांनी म्हटले की, खुनप्रकरणात आरोपी असलेले भाजपाध्यक्ष अमित शहा, वाह काय शान आहे त्यांची. तुम्ही जय शहाला ओळखता का? जय शहा म्हणजे जादूगर आहे. त्यांनी अवघ्या तीन महिन्यांत ५० हजार रुपयांचे ८० कोटी करुन दाखवले, असा टोला यावेळी राहुल यांनी हाणला.
यावेळी राहुल यांनी बेरोजगारीच्या मुद्द्यावरूनही मोदी सरकारला लक्ष्य केले. गेल्या पाच वर्षांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील जनतेवर अन्याय केला आहे. त्यामुळे काँग्रेसचे सरकार आल्यावर आम्ही बेरोजगार तरुणांना न्याय देऊ. काँग्रेसची सत्ता आल्यावर एका वर्षात २२ लाख सरकारी पदे भरली जातील, असे आश्वासन यावेळी राहुल यांनी दिले.
तसेच राहुल यांनी काँग्रेसच्या न्याय योजनेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्या नरेंद्र मोदी यांनाही प्रत्युत्तर दिले. नरेंद्र मोदी म्हणतात न्याय योजनेसाठी पैसे कुठून येणार? अदानी आणि अंबानींकडून मी काढून देणार. आम्ही सत्तेत आलो तर राफेल प्रकरणाची चौकशी करु, असे राहुल यांनी सांगितले.