मोहन भागवतांचे वक्तव्य म्हणजे भारतीयाचा अपमान : राहुल गांधी
संविधानाने मान्यता दिल्यास आणि जरूरत पडल्यास लढण्यासाठी आरएसएसमध्ये केवळ तीन दिवसात लष्कर तयार करण्याची क्षमता आहे, असे विधान भागवत यांनी केले आहे.
नवी दिल्ली: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी केलेल्या विधानावर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी तीव्र शब्दात टीका केली आहे. आरएसएस प्रमुखांनी केलेले विधान म्हणजे देशासाठी शहीद झालेल्या भारतीयाचा अपमान आहे. इतके लज्जास्पद विधान करताना भागवतांना काहीतरी वाटायला हवे, असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे.
काय म्हणाले होते भागवत?
भारतीय लष्कराला सैनिक तयार करण्यासाठी सहा ते सात महिने लागतील. पण, संविधानाने मान्यता दिल्यास आणि जरूरत पडल्यास लढण्यासाठी आरएसएसमध्ये केवळ तीन दिवसात लष्कर तयार करण्याची क्षमता आहे, असे विधान भागवत यांनी केले आहे. सहा दिवसीय मुजफ्फरपुर दौऱ्यादरम्यान भागवत यांनी हे विधान केले.
राहुल गांधींची तीव्र शब्दांत टीका
भागवतांच्या विधानवर राहुल गांधींनी ट्विटरच्या माध्यमातून हल्ला चढवला आहे. आरएसएस प्रमुखांनी आपल्या वक्तव्यातून प्रत्येक भारतीयाचा अपमान केला आहे. हा अपमान त्या लोकांचा अपमान आहे. जे देशासाठी शहीद झालेत. हा आमच्या राष्ट्रध्वजाचा अपमान आहे. कारण प्रत्येक सैनिक ध्वाजाला सलाम करतो. आमच्या शहीद जवानांना अपमानीत करताना भागवतांना लाज वाटायला हवी होती, असे राहुल गांधींनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.