Congress अध्यक्षा सोनिया गांधींचा आक्रमक पवित्रा, दारुण पराभवानंतर घेतला हा निर्णय
विधानसभा निवडणुकीत (Assembly Election Result 2022) झालेल्या दारुण पराभवानंतर काँग्रेस पक्षाने घेतला महत्त्वाचा निर्णय
नवी दिल्ली : देशातील 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत (Assembly Election Result 2022) झालेल्या दारुण पराभवानंतर काँग्रेस (Congress) पक्षाला मोठा धक्का बसला आहे. पक्षात आता बदल होत आहेत. पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांनी यासाठी मोठा निर्णय घेतला आहे.
पाच राज्यातल्या पराभवानंतर काँग्रेस अॅक्शन मोडवर आलीय. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींनी पाच प्रदेशाध्यक्षांचे राजीनामे मागितले आहेत. त्यामुळे सिद्धू,अजय लल्लूंना राजीनामा द्यावा लागणार आहे. पंजाब, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, गोवा, मणिपूर या पाच राज्यांमध्ये काँग्रेसला मोठा दणका बसलाय. त्यानंतर सोनिया गांधींनी आक्रमक पवित्रा घेत पाच राज्यांच्या प्रदेशाध्यक्षांना राजीनामा देण्यास सांगितलं आहे.
नव्याने जबाबदारीचं वाटप
सूत्रांच्या माहितीनुसार, काँग्रेस अध्यक्षा (Congress President ) सोनिया गांधी यांनी उत्तराखंड, पंजाब, गोवा आणि मणिपूरच्या प्रदेशाध्यक्षांचा राजीनामा मागवला आहे. पक्षाचं मत आहे की, या प्रदेशाध्यक्षांच्या राजीनाम्यानंतर राज्यात नव्याने पक्षाच्या लोकांना जबाबदारी सोपवली जाईल.
राहुल गांधी यांनी पंजाबमधील पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी सिद्धू यांच्याकडे सोपवली होती. दुसरीकडे अजय कुमार लल्लू हे पक्षाच्या सरचिटणीस प्रियांका गांधी वाड्रा यांचे खास व्यक्ती मानले जातात.
पंजाबसह देशातील 5 राज्यांमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला दारुण पराभवाला सामोरे जावे लागत आहे. पंजाबमध्ये झालेल्या निवडणुकीत काँग्रेसचे सरकार गेले. दुसरीकडे मणिपूर, गोवा, उत्तराखंड आणि यूपीमध्ये काँग्रेसची अवस्था बिकट झाली आहे. काँग्रेसच्या या निराशाजनक पराभवानंतर पक्षातूनच गांधी कुटुंबावर निशाणा साधला जात आहे.