Rahul Gandhi Denies to aplogise: काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्यावर कारवाई करत खासदारकी रद्द करण्यात आली आहे. लोकप्रतिनिधी कायद्यानुसार जर खासदार किंवा आमदाराला दोन किंवा त्यापेक्षा अधिक वर्षांची शिक्षा झाली तर सदस्यत्व रद्द केलं जातं. सूरत कोर्टाने (Surat Court) मोदी (Modi) आडनावासंबंधी केलेल्या टिप्पणणीनंतर दोन वर्षांची शिक्षा सुनावल्यानंतर लोकसभा सचिवालयाने तात्काळ कारवाई करत खासदारकी रद्द केली. दरम्यान यानंतर राहुल गांधी आक्रमक झाले असून पत्रकार परिषद घेत आपली भूमिका मांडली. यावेळी त्यांनी आपण माफी मागणार नसल्याची भूमिकेवर ठाम असल्याचं सांगत पुन्हा एकदा वीर सावकरकांचा (Veer Savarkar) उल्लेख केला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लोकसभा सचिवालयाने कारवाई करत खासदारकी रद्द केल्यानंतर राहुल गांधी यांनी आपली भूमिका मांडली. यावेळी त्यांनी पुन्हा एकदा उद्योजक गौतम अदानी यांचा उल्लेख करत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांचं नातं काय? अशी विचारणा केली. अदानी यांना 20 हजार कोटी कोणी दिले अशी विचारणा यावेळी त्यांनी केली. तसंच हा देशाच्या लोकशाहीवर हल्ला असल्याची टीका त्यांनी केली आहे. 


"माफी मागायला मी सावरकर नाही"


भाजपाचे लोक वारंवार तुम्ही माफी मागावी अशी मागणी करत असल्यासंबंधी विचारण्यात आलं असता राहुल गांधी यांनी मी सावरकर नाही असं भाष्य केलं. ते म्हणाले की "माझं नाव सावरकर नाही, गांधी आहे. गांधी कोणाची माफी मागत नाही. संसदेत मी बोलू देण्याची विनंती केली होती. मी दोनवेळा पत्रही लिहिलं होतं. मी लोकसभा अध्यक्षांची जाऊन भेट घेतली आणि तुम्ही लोकशाहीचे संरक्षणकर्ते आहात, बोलू द्या असं सांगितलं. त्यावर ते हसत आपण करु शकत नाही असं म्हटलं. त्यावर मी मग तुम्ही नाही करु शकत, तर मग कदाचित जाऊन नरेंद्र मोदींना भेटावं लागेल. ते तर हे होऊ देणारच नाहीत". 



"या देशात लोकशाही संपली आहे. या देशातील लोक जे मनात आहे ते बोलू शकत नाही. या देशाच्या संस्थांवर आक्रमण होत आहे. नरेंद्र मोदी आणि अदानी यांचं नातं हे याचं मूळ कारण आहे. मी मोदी नाही तर अदानींसंबंधी प्रश्न विचारत आहे. भाजपा अदानींचं संरक्षण का करत आहे? तुम्ही मोदींचं संरक्षण करा. तुम्हीच अदानी आहात म्हणूनच तर त्यांचं रक्षण करत आहात," असा आरोप राहुल गांधी यांनी यावेळी केला.


"मोदी आणि अदानी यांच्यात जुनं नातं"


"नरेंद्र मोदी आणि अदानी यांच्याच फार जुनं नातं आहे. जेव्हा नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री झाले तेव्हापासून हे नातं आहे. मी विमानात बसलेला त्यांचा फोटो दाखवला होता. ते आपल्या मित्रासह अत्यंत निवांत बसले होते," असं राहुल गांधी म्हणाले. 



"मी मोदींच्या डोळ्यात भीती पाहिली"


"अदानीसंबंधी मी केलेल्या भाषणानंतर पंतप्रधान घाबरले आहेत. मी त्यांच्या डोळ्यात भीती पाहिली आहे. यासाठी त्यांनी त्यावरुन लक्ष हटवलं आणि आता माझी खासदारकी रद्द केली," असा दावा राहुल गांधी यांनी केला आहे.