नवी दिल्ली : भारत सरकारने पुढे येऊन सद्यस्थितीला नेमकी काय परिस्थिती आहे, याबाबतची स्पष्टोक्ती करावी, असा आग्रही सूर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आळवला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काही दिवसांपूर्वी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून भारत- चीन सीमा प्रश्नावर फार न बोललेल्या गांधी यांनी ट्विट करत आता सरकारने आणखी मौन पाळू नये असा सल्ला थेट शब्दांत दिला आहे. 


'चीनसोबतच्या सीमा प्रश्नावर सरकारचं मौन हे तर्कवितर्क आणि अनिश्चिततेला आणखी वाव देत कुशंका निर्माण करत आहे. त्यामुळं भारत सरकारनं स्वच्छ प्रतिमेनं पुढे येत सद्यस्थितीला नेमकं काय घडत आहे याची माहिती द्यावी' असं ट्विट राहुल गांधी यांनी केलं. 


 #ChinaIndiaFaceoff असा हॅशटॅग जोडत त्यांनी अतिशय तणावपूर्ण परिस्थिती निर्माण करणाऱ्या भारत- चीन सीमा प्रश्नाच्या मुद्द्यावर आपली आग्रही भूमिका स्पष्ट केली.  सत्ताधारी पक्षानं पुढे येत  देशवासियांच्या प्रश्नांची उत्तरं द्यावीत अशाच एकंदर भूमिकेमध्ये विरोधी पक्षातील नेतेमंडळी गेल्याकाळी काळापासून सूर आळवत आहेत. 



 


सिक्कीम आणि लडाख येथे भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये झालेल आमनासामना आणि त्यानंतर उभे राहिलेले काही महत्त्वाचे मुद्दे हा सीमावाद आणखी वेगळ्या वळणावर घेऊन गेले. परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार सध्या दोन्ही राष्ट्रांच्या सैन्यांमध्ये या मुद्द्यावरुन चर्चा सुरु आहेत. ज्या आधारे परस्पर सामंजस्याने त्यावर तो़डगा काढण्याकडेच सर्वांचा भर असेल असं स्पष्ट करण्यात येत आहे.