पणजी : गोव्यातील काँग्रेस आमदारांना पैशाचे आमिष दाखवण्यात आले आहे. तसेच ज्यांना मंत्रिपद देण्यात येणार त्यांना २५ कोटी तर ज्यांना मंत्रिपदे मिळणार नाहीत, त्यांना ५० कोटी दिले, असा आरोप गोवा काँग्रेसचे प्रवक्ते ट्राजानो डिमेलो यांनी केला आहे. तसेच ज्या आमदारांनी काँग्रेस सोडली आहे. त्यांच्यावर अनेक प्रकारचे गुन्हे दाखल होते. असे आमदार गेल्याने काँग्रेस स्वच्छ झाली आहे, असे डिमेलो म्हणालेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तर दुसरीकडे दिल्लीत संसद भवन परिसरात विरोधकांनी आंदोलन केले. कर्नाटक आणि गोव्यातील सत्ता संघर्षाच्या मुद्द्यावरून विरोधकांनी हे आंदोलन केले. विविध मार्गांनी आमदारांची कोंडी करून त्यांना भाजपमध्ये येण्याची जबरदस्ती केली जात आहे, असा आरोप काँग्रेसने केला आहे. या आंदोलनात ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी, खासदार राहुल गांधी, आनंद शर्मा हे सहभागी झाले होते.


काँग्रेसला मोठा झटका, १० आमदार भाजपात दाखल


दरम्यान, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत आणि गोवा प्रदेश भाजपची कोअर टीम आणि काँग्रेसमधून बुधवारी भाजपमध्ये दाखल झालेले दहा आमदार हे एकत्रितपणे आज भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांची भेट घेणार आहे. तसेच गोव्यात मंत्रिमंडळाची फेररचना केली जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे ही भेट महत्वाची असल्याचे बोलले जात आहे.


काँग्रेसच्या १५ आमदारांपैकी १० आमदार भाजपने आपल्या गळाला लावले आहे. हा काँग्रेसला हादरा आहे. विधानसभा निवडणुकीत काँग्रेस सर्वात मोठा पक्ष असताना भाजपने सत्ता स्थापन केली. मात्र, महाराष्ट्राची पुनरावृत्त गोव्यात झालेली पाहायला मिळत आहे. काँग्रेसचे विरोधी पक्षनेते भाजपने फोडत त्यांना पक्षात घेतले आहे. त्यांना उपमुख्यमंत्री पद मिळण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.