अहमदाबाद : गुजरातमध्ये झालेल्या राज्यसभा निवडणुकीत पक्षाचा आदेश धाब्यावर बसवणाऱ्या ८ आमदारांचं काँग्रेसमधून निलंबन करण्यात आलं आहे. निवडणुकीवेळी काँग्रेसनं काढलेल्या व्हिपचं उल्लंघन केल्यामुळे या आमदारांवर कारवाई करण्यात आली आहे. याचबरोबर येत्या काही दिवसांमध्ये आणखी ६ आमदारांचंही निलंबन करण्यात येणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

निलंबन करण्यात आलेले हे ८ आमदार शंकरसिंग वाघेला यांचे समर्थक आहेत. शंकरसिंग वाघेला यांनी निवडणुकीआधी काँग्रेसविरोधात बंड केलं होतं. शंकरसिंग यांच्या बंडखोरीचा फायदा या निवडणुकीत भाजपनं घेतला आणि काँग्रेस नेते आणि सोनिया गांधींचे राजकीय सल्लागार अहमद पटेल यांना तगडं आव्हान दिलं.


गुजरातमधून राज्यसभेसाठीच्या तिसऱ्या जागेसाठी झालेल्या मतदानावेळी काँग्रेसच्या दोन आमदारांनी क्रॉस व्होटिंग केलं. या क्रॉस व्होटिंगविरोधात काँग्रेसनं निवडणूक आयोगाकडे तक्रार केली. अखेर निवडणूक आयोगानं ही दोन मतं रद्द केली आणि अहमद पटेल यांचा निसटता विजय झाला. अहमद पटेल यांना या निवडणुकीत ४४ मतं मिळाली तर त्यांच्याविरोधात उभ्या असलेल्या बलवंतसिंह राजपूत यांना ३८ मतं मिळाली.