काँग्रेसच्या झोळीत सॉफ्ट हिंदुत्वाचे दान? 27 मंदिरतील दर्शनांच्या बदल्यात राहुलना मिळाले 47 जागांचे दान
राहुल गांधींनी गुजरातमधील 27 मंदिरांना भेटी दिल्या. त्या बदल्यात राहुल यांना 47 जागा मिळाल्या अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
नवी दिल्ली : गुजरात विधानसभा निवडणुकीत भाजपचा विजय झाला. पण, विशेष असे की कॉंग्रेसचीही विशेष हार झाली नाही. उलट गुजरातमधील कॉंग्रेसचा जनाधार आणि विधानसभेच्या जागाही पूर्वीपेक्षा वाढल्या. त्यामुळे गुजरातमधील काँग्रेसच्या विजयाला राहुल गांधींचा करिश्मा म्हणून ओळखले जात असले तरी, सॉफ्ट हिंदूत्वाची काँग्रेसची खेळी यशस्वी ठरल्याचे जाणकारांचे म्हणने आहे. कारण, राहुल गांधींनी गुजरातमधील 27 मंदिरांना भेटी दिल्या. त्या बदल्यात राहुल यांना 47 जागा मिळाल्या अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
राहुल गांधांच्या मंदिर प्रवेशाला विरोधकांचा आक्षेप
गुरजारतच्या संपूर्ण प्रचारादरम्यान राहुल गांधींनी विरोधकांची चांगलीच पंचायत केली. ते कधी द्वारकेला जात तर, कधी अंबाजी मंदिराला भेट देत. कधी ते मेघमाया मंदिरात दर्शन घेत तर, कधी मंदिरात आरती करत. राहुल गांधी यांनी प्रचारादरम्यान मंदिर भेटीचा सिलसिला इतका कायम ठेवला की, विरोधकांच्या गोटात अस्वस्थता निर्माण झाली. त्यामुळे विरोधकांनी राहुल गांधींवर आरोपांची झोड उठवली. इतकी की, राहुल गांधींच्या मंदिर प्रवेशावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले. तसेच, ते मशीदींमध्ये का जात नाहीत असा सवालही विरोधकांनी विचारला. पण, राहुल गांधींनी आपल्या मंदिर भेटी सुरूच ठेवल्या. त्याचा गुजरातमध्ये त्यांना फायदाही झाल्याचे दिसून आले. मंदीर प्रभावीत क्षेत्रांमध्ये काँग्रेसला 87 पैकी 47 जागा मिळाल्या.
राहुल गांधींनी कोणकोणत्या मंदिरात घेतले दर्शन?
अंबाजी मंदिर - बनासकांठा जिल्ह्यात असलेले हे मंदिर आदिवासी समुदयाची देवी म्हणून प्रसिद्ध आहे. इथे राहुल गांधी यांच्याप्रमाणे पंतप्रधान मोदींनीही दर्शन घेतले होते. या मंदिराचा जवळपास 30 मतदारसंघांवर प्रभाव पडतो. ज्यात 19 जागांवर काँग्रेसने विजय मिळवला आहे.
द्वारका - द्वारका जिल्ह्यातील हे एक कृष्णमंदिर. हिंदू धर्मातील चार धामांपैकी एक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या मंदिराचा 3 जिल्ह्यातील 9 मतदारसंघावर प्रभाव पडतो. इथेही राहुल गांधींना 5 जागांवर विजय मिळाला आहे. तर, उर्वरीत जागांपैकी भाजप 3 आणि राष्ट्रवदी काँग्रेसला एका ठिकाणी विजय मिळाला आहे.
सोमनाथ : सौराष्ट्रातील सोमनाथ जिल्ह्यातील हे मंदिर भगवान शंकरांना समर्पित आहे या मंदिरात दर्शनाला गेलेल्या राहुल गांधी यांच्या मंदिर प्रवेशाबाबत वाद निर्माण झाला होता. या जिल्ह्यातही काँग्रेसने 4 जागांवर विजय मिळवला आहे. 2012 मध्ये काँग्रेसला इथे 3 जागा होत्या. आता एक जागा वाढून मिळाली.
अक्षरधाम मंदिर : गुजरातची राजधानी असलेल्या गांधीनगर येथील स्वामी नारायण सांप्रदायाचे असलेल्या या मंदिरात पंतप्रधान मोदी आणि अमित शहा यांनीही या मंदिराला भेट दिली होती. या मंदिराचा जवळपास 33 मतदारसंघांवर प्रभाव पडतो. येथेही राहुल गांधी यांना 17 जागा मिळाल्या आहेत. तर, भाजपला 16.
वीर मेघमाया : गुजरात येथील पाटन जिल्ह्यातील वीर मेघमाया मंदिरात राहुल गांधी दुसऱ्या टप्प्याच्या प्रचारासाठी पोहोचले होते. जवळपास 11 जागांवर प्रभाव टाकणाऱ्या या मंदिर परिसरातून काँग्रेसला 6 तर, भाजपला 5 जागा मिळाल्या.