काँग्रेसला भारतीय अर्थव्यवस्था उद्ध्वस्त करायचेय- जेटली
काँग्रेसच्या एका नेत्याने मला पत्र पाठवून व्यथा मांडली आहे.
नवी दिल्ली: काँग्रेस ही राष्ट्रीय घातपाती संघटना आहे. त्यांना भारताची अर्थव्यवस्था उद्ध्वस्त करायची आहे, असा घणाघाती आरोप केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांनी केला. गेल्या काही दिवसांत राफेल विमान खरेदीच्या मुद्द्यावरून काँग्रेसने सरकारला चहुबाजुंनी घेरले आहे. या पार्श्वभूमीवर सोमवारी अरूण जेटली यांनी ट्विटरच्या माध्यमातून काँग्रेसवर प्रतिहल्ला चढवला. त्यांनी म्हटले की, काँग्रेस ही राष्ट्रीय घातपाती संघटना आहे. त्यांच्याकडून सरकार आणि कंपन्यांचे संबंधात अडथळे आणि दरी निर्माण करायची आहे. जेणेकरून सर्व परिस्थिती हाताबाहेर जाईल. नेतृत्व आणि दूरदृष्टीच्या अभावामुळे हे घडत असल्याची टीका जेटली यांनी केली.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री के.व्ही. थॉमस यांनी मला काही दिवसांपूर्वी पत्र पाठवले होते. हे पत्र मी जाहीर करावे, अशी त्यांचीच इच्छा होती. या पत्रात थॉमस यांनी म्हटले होते की, राहुल गांधी आणि त्यांच्या कंपूकडून होत असलेल्या प्रत्येक प्रचाराचा मी निषेध करतो. खरंतर राहुल गांधींना कोणीतरी शहाणपणाचे चार शब्द सांगण्याची गरज आहे, असे थॉमस यांनी म्हटले आहे.
देशातील भांडवदारांची कंपूशाही संपुष्टात आली आहे, हे काँग्रेसने ध्यानात घ्यायला पाहिजे. आमचे सरकार या समस्यांकडे प्रामाणिक आणि व्यावसायिक दृष्टीकोनातून बघत असल्याचेही जेटली यांनी सांगितले.