सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्याविरोधातील महाभियोग प्रस्ताव याचिका मागे
सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्याविरोधात महाभियोग प्रस्तावावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार होती मात्र, काँग्रेसने आपली याचिका मागे घेतली.
नवी दिल्ली : सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्याविरोधात महाभियोग प्रस्तावावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार होती मात्र, काँग्रेसने आपली याचिका मागे घेतल्याने सुनावणी रद्द करण्यात आलेय. दीपक मिश्रा यांच्याविरोधातला महाभियोग प्रस्ताव उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी फेटाळून लावला होता, त्याविरोधात काँग्रेसचे राज्यसभेतले खासदार प्रताप सिंह बाजवा और अमीबेन याग्निक यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.
काँग्रेससह सात विरोधी पक्षाच्या ६४ खासदारांनी २० एप्रिलला दीपक मिश्रांविरोधात महाभियोग प्रस्तावाची नोटीस दिली होती. पदाच्या गैरवापरासह दीपक मिश्रांवर अनेक आरोप ठेवण्यात आले होते. पण दीपक मिश्रांविरोधातल्या आरोपांमध्ये तथ्य नसल्याचं सांगत २३ एप्रिलला उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडूंनी हा प्रस्ताव फेटाळून लावला होता.
सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्याविरोधात दाखल करण्यात आलेला महाभियोग प्रस्ताव उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी फेटाळल्याविरोधात काँग्रेसने सुप्रीम कोर्टात धाव घेत याचिका दाखल केली होती. नायडू यांनी नोटीस फेटाळल्यानंतर लगेचच काँग्रेसने पत्रकार परिषेद घेऊन याविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात याचिका करण्याचे जाहीर केले होते. ती पत्रकार परिषद सिब्बल यांनीच घेतली होती व त्यावेळी त्यांनी याचिका दाखल झाल्यावर सरन्यायाधीशांनी प्रशासकीय आणि न्यायिक या दोन्ही भूमिकांतून या याचिकेपासून स्वत:ला दूर ठेवावे,अशी अपेक्षा व्यक्त केली होती.