मध्यप्रदेश: मुख्यमंत्र्यांच्या घराबाहेर काँग्रेस कार्यकर्त्यांचं शक्तीप्रदर्शन
काँग्रेस 15 वर्षानंतर सत्तेत...
भोपाळ : शिवराज सिंह चौहान यांनी मध्य प्रदेश मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर राजधानी भोपाळमधील श्यामला हिल्स इथं असलेल्या मुख्यमंत्री निवासस्थानाबाहेर कहीं ख़ुशी, कहीं गम असं वातावरण पाहायला मिळतं आहे. एकीकडे शिवराज सिंह यांच्यासाठी ममत्व भावना असलेल्या व्यक्तींच्या भावनांचा बांध फुटत आहे तर दुसरीकडे काँग्रेस कार्यकर्ते मुख्यमंत्री निवासाबाहेर बाहेर मोठ्या काळानंतर पक्षाच्या झेंड्यांसह शक्तीप्रदर्शन करीत आहेत. मध्यप्रदेशात ११४ जागांवर ताबा मिळवत काँग्रेस हा इथला सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. या निकालानंतर आज बसपाच्या प्रमुख मायावतींनी मध्य प्रदेशात काँग्रेसला पाठिंबा जाहीर केला आहे.
मध्य प्रदेशात काँग्रेसला ११४ जागा मिळाल्या आहेत. त्यात समाजवादी पक्षाच्या एका आमदारानं आधीच त्यांना पाठिंबा दिलाय. त्यापाठोपाठ बसपाच्या दोन आमदारांचा पाठिंबा मिळाल्यानं आता काँग्रेसनं बहुमाताचा आकडा ओलांडला आहे. काँग्रेसकडे आता ११७ आमदार असून भाजपाकडे सध्या १०९ आमदार आहेत. त्यामुळे तब्बल 15 वर्षानंतर सत्तेत येत आहेत.
मध्यप्रदेशचे मावळते मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी निवडणुकीत भाजपचा झालेला पराभव मान्य केला आहे. भाजपला अधिक मतं मिळाली असली तरी बहुमत मात्र मिळालेलं नाही. त्यामुळे सत्ता स्थापनेसाठी भाजप दावा करणार नाही. संख्याबळासमोर आम्ही आमची मान झुकवतो असं म्हणत मध्यप्रदेशच्या मुख्यमंत्रीपदाचा शिवराजसिंह चौहान यांनी राजीनामा आज सकाळी राज्यपालांकडे सुपूर्द केला. त्यांनी ज्या शैलीत हा जनादेश स्वीकारल्याचं सांगितलं ते पाहून अनेकांना १९९६ च्या अटल बिहारी वाजपेयींच्या भाषणाची आठवण झाली. त्यावेळी, बहुमत न जमवू शकल्यानं अटल बिहारी वाजपेयींनी लोकसभेत भाषण देतानाच १३ दिवसांच्या सरकारचा राजीनामा सादर केला होता.
'जनतेनं विरोधी पक्षाला जनादेश दिला नव्हता परंतु, लोकशाहीत बहुमताचा खेळ असतो... अशा वेळी आम्ही संख्याबळासमोर मान झुकवतो. मी राष्ट्रपतींकडे आपला राजीनामा सोपवण्यासाठी जात आहे' असं म्हणत त्यांनी जनादेशाला सर्वोत्तम स्थान दिलं होतं.