नवी दिल्ली : भारत-चीन सीमेवर चीनच्या कुरापती सुरुच आहेत. मागच्या एक वर्षापासून चीननं भारतीय सीमेत घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला आहे. आता चीनने सीमेजवळ पुन्हा एकदा बांधकाम करण्यास सुरुवात केली आहे. लाइन ऑफ अ‍ॅक्चुअल कंट्रोलजवळील सिक्किम, पूर्व लडाखमध्ये स्थायी बांधकाम करण्यास सुरुवात केली आहे. यामुळे पुन्हा एकदा तणावाची स्थिती निर्माण झाली आहे. चीनी सैनिक भारतीय सीमेजवळ ठाण मांडून बसण्यासाठी तयारी करत असल्याचं यातून दिसत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

उत्तर सिक्किमच्या नकुल भागापासून काही किलोमीटर अंतरावर हे बांधकाम सुरु आहे. या भागात भारतीय जवान आणि चीन सैनिकांमध्ये झडप झाली होती. गेल्या काही दिवसात चीन सीमेवर आपली ताकद वाढवत असल्याचं दिसत आहे. चीनी सैनिकांना थंडीपासून संरक्षण मिळावं तसंच आवश्यकता असल्यास चाल करण्यासाठी हे बांधकाम केलं जात आहे. या प्रकारचं बांधकामं लडाखसह अरुणाचल प्रदेशातील भारतीय सीमेजवळ बनवली गेल्याची सूत्रांची माहिती आहे. त्यासोबत सीमेवर पोहोचण्यासाठी हायटेक रस्त्यांची निर्मितीही करण्यात आली आहे.


या वर्षाच्या सुरुवातीलाच भारत आणि चीन दरम्यान तणावपूर्ण स्थिती निर्माण झाली होती. चीननं मोठ्या संख्येनं सीमेवर सेना तैनात केली होती. तसंच भारतीय हद्दीत शिरकावही केला होता. त्यामुळे भारतीय सैनिकांनी चीनी सैनिकांना बंदीस्त केलं होतं. त्यानंतर दोन्ही सैन्य दलाच्या अधिकाऱ्यांमध्ये चर्चेच्या फेऱ्या पार पडल्या. मागच्या वर्षी मे महिन्यात भारत आणि चीनमध्ये सीमेवरून वादाला सुरुवात झाली. त्यानंतर दोन्ही देशाचे सैनिक भिडले होते. 


15 जून 2020 मध्ये गलवान खोऱ्यात चीनी सैनिकांनी भारतीय सैनिकांवर हल्ला चढवला होता. त्यांना भारतीय सैनिकांनी जशाच तसं उत्तर दिलं होतं. या हल्ल्यात भारताचे 20 जवान शहीद झाले होते. तर चीननं कित्येक महिने काहीच झालं नसल्याचा कांगावा केला. मात्र अखेर चीननंही आपले सैनिक मारले गेल्याचं जाहीर केलं. मात्र आकडा अद्यापही जाहीर केलेला नाही.