मेरठ : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ पुन्हा एकदा वादात सापडले आहेत. आदित्यनाथ यांनी पुन्हा एकदा 'अली' विरुद्ध 'बजरंगबली' अशा धार्मिक वादाला तोंड फोडलंय. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ एक निवडणूक रॅलीला संबोधित करत असताना त्यांनी हे वादग्रस्त वक्तव्य केलंय. 'काँग्रेस-बीएसपी-एसपी महाआघाडीला 'अली'वर विश्वास आहे, तर आम्हालाही 'बजरंग बली'वर विश्वास आहे' असं त्यांनी आपल्या भाषणात म्हटलं. इतक्यावरच ते थांबले नाहीत तर 'दुसऱ्या पक्षानी हे मान्य केलंय की बजरंग बलीचे अनुयायी त्यांना मतं देणार नाहीत' असं म्हणत त्यांनी महाआघाडी आणि काँग्रेसवर निशाणा साधला.



'...हिंदुंकडेही पर्याय नाही'


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'बीएसपी प्रमुख मायावती यांनी मुस्लिमांना म्हटलंय की त्यांनी केवळ महाआघाडीला मतं द्यावीत आणि आपल्या मतांत फूट पडू देता कामा नये... आता हिंदुंकडेही भारतीय जनता पक्षाशिवाय दुसरा कोणताही पर्याय उरलेला नाही' असं मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी म्हटलं.


मुख्यमंत्री योगीयांनी उपस्थित केलेला 'अली' आणि 'बजरंग बली' हा वाद याआधीही उपस्थित केला होता. याअगोदर मध्यप्रदेश आणि राजस्थानमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी याच विषयावर अनेक आक्षेपार्ह आणि धार्मिक वक्तव्यं केली होती. एका निवडणूक रॅलीत तर त्यांनी भारतीय सेनेला 'पंतप्रधान मोदींची सेना' म्हटलं होतं.