फुटीरतावादी नेत्यांशी वाटाघाटी, दिनेश्वर शर्मा यांच्या नियुक्तीवरुन वाद
जम्मू काश्मीरमध्ये फुटीरतावादी नेत्यांशी वाटाघाटी करण्यासाठी केंद्र सरकारनं माजी आयबी प्रमुख दिनेश्वर शर्मा यांची विशेष प्रतिनिधी म्हणून नियुक्ती केली आहे. मात्र, त्यांच्या या नियुक्तीवर फुटीरतावादी नेत्यांनी जोरदार आक्षेप नोंदवलाय.
श्रीनगर : जम्मू काश्मीरमध्ये फुटीरतावादी नेत्यांशी वाटाघाटी करण्यासाठी केंद्र सरकारनं माजी आयबी प्रमुख दिनेश्वर शर्मा यांची विशेष प्रतिनिधी म्हणून नियुक्ती केली आहे. मात्र, त्यांच्या या नियुक्तीवर फुटीरतावादी नेत्यांनी जोरदार आक्षेप नोंदवलाय.
आंतरराष्ट्रीय समुदायाच्या दबावामुळं केंद्र सरकारनं त्यांना चर्चेसाठी पाठवलं असलं तरी हा केवळ कालहरण करण्याचा प्रयत्न आहे, अशी टीका हुरियत कॉन्फरन्सचे नेते सय्यद अली शाह गिलानी, हुरियत नेते मिरवैझ उमर फारूख आणि जेकेएलएफचे प्रमुख यासिन मलिक यांनी केलीय. यामुळं काश्मिरी जनतेचे मूळ प्रश्न सुटणार नाहीत, असंही त्यांनी सांगितलं.
काश्मीरमधील शांतता प्रक्रियेअंतर्गत स्थिर संवादासाठी गुप्तचर विभागाचे माजी प्रमुख दिनेश्वर शर्मा यांची ही नियुक्ती करण्यात आली आहे. केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली होती. त्यांच्या निवडीवर आता आक्षेप घेतला जात आहे. त्यामुळे भाजपला त्यांची नियुक्तीबाबत नवा सामना करावा लागत आहे.