नवी दिल्ली: निर्भया बलात्कार प्रकरणातील दोषी विनय शर्मा याच्यावर काही दिवसांपूर्वी विषप्रयोग झाला होता, असा खळबळजनक आरोप करण्यात आला आहे. विनय शर्मा याच्या वकिलांनी न्यायालयात झालेल्या सुनावणीवेळी म्हटले की, विनय याला तिहार तुरूंगात (Slow Poison) विष देण्यात आले होते. यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, रुग्णालयाने त्यावेळी आपल्याला कोणतीही माहिती दिली नसल्याचा आरोप विनय शर्मा याच्या वकिलांनी केला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'निर्भया' प्रकरणातील दोषी म्हणतात '...तर फाशीची गरज काय?'


निर्भया बलात्कार प्रकरणातील दोषींना १ फेब्रुवारीला फासावर लटकवण्यात येणार आहे. त्यादृष्टीने तिहार तुरुंगात सर्व तयारीही पूर्ण झाली आहे. मात्र, दोषींच्या वकिलांकडून कायदेशीर पळवाटांचा अवलंब करून फाशीची शिक्षा पुढे ढकलण्याचा प्रयत्न होत आहे. आतादेखील विनय शर्मा याच्या वकिलांकडून तसा प्रयत्न होत असल्याची चर्चा आहे.



विनय शर्मा याचे वकील एपी सिंह यांनी याचिकेत म्हटले आहे की, तिहार जेल प्रशासनाने अद्याप दोषी पवन, अक्षय आणि विनय यांची कागदपत्रे दिली नाहीत. म्हणूनच, राष्ट्रपतींकडे क्यूरेटिव्ह याचिका आणि दया याचिका पाठविण्यास विलंब होत आहे. मात्र, फिर्यादी पक्षाच्या वकिलांनी हा दावा फेटाळून लावला आहे. दोषीच्या वकिलांकडून वेळकाढूपणा करण्यात येत असल्याचा आरोप फिर्यादी पक्षाच्या वकिलांनी केला.  यापूर्वी २०१६ मध्ये विनय शर्मा याने तिहार तुरुंगात फास लावून आत्महत्या करण्याचाही प्रयत्न केला होता. यापूर्वी त्याने झोपेच्या गोळ्यांचे सेवनही केल्याची माहिती समोर आली होती. मात्र, वेळीच रुग्णालयात दाखल केल्याने त्याचा जीव वाचला होता.