मुंबई : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने देशभरात थैमान घातले आहे. यामुळे कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. यादरम्यान केंद्र सरकारने कोविड केअर सेंटर आणि रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्यासाठी नियमांमध्ये काही बदल केले आहेत. आता कोरोना रुग्णांना सरकारी किंवा खासगी रुग्णालयात किंवा कोविड सेंटरमध्ये भरती होण्यासाठी कोरोनाच्या पॉझिटिव्ह रिपोर्टची आवश्यकता लागणार नाही. अर्थात एखाद्या रुग्णाला अस्वस्थ वाटत असेल, मात्र कोरोना चाचणी निगेटिव्ह आली आहे, तरी सुद्धा तो रुग्ण कोविड केअर सेंटर किंवा रुग्णालयात दाखल होऊ शकतो.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना देण्यात आलेल्या निर्देशांमध्ये केंद्र सरकारने हे स्पष्ट केले आहे, की रुग्णालयात दाखल होण्यासाठी रुग्णांना कोरोना पॉझिटिव्ह रिपोर्टची आवश्यकता नाही. केंद्र सरकारच्यावतीने कोविड नॅशनल पॉलिसीमध्ये अजून काही बदल करण्यात आले आहेत. कोरोना संशयितांनाही कोविड केअर सेंटर, डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर किंवा डेडिकेटेड कोविड हॉस्पिटलच्या वॉर्डामध्ये दाखल करण्यात येईल.


केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सांगितले की, कोणत्याही रुग्णाला ऑक्सिजन किंवा औषधांची आवश्यकता भासल्यास ते पुरविल्या जातील. तसंच आवश्यकता असेल तरच रुग्णालयात दाखल व्हा, असेही आरोग्य मंत्रालयाने सांगितले आहे. जर एखाद्या रुग्णांकडे अधिकृत ओळखत्र नसेल, अथवा तो व्यक्ती दुसऱ्या शहरातील रहिवाशी असेल तरीही त्याला रुग्णालयात दाखल होण्याची मुभा दिली गेली आहे. जर एखाद्या व्यक्तीने रुग्णालयात विनाकारण बेड अडवला असेल तर तात्काळ तो रिकामा केला जाईल, असे निर्देशही आरोग्य मंत्रालयाकडून जारी करण्यात आले आहे.