कोरोनाचे संकट : पंतप्रधानांना सोनिया गांधी यांच्या `या` काटकसरीच्या सूचना
कोरोना व्हायरस विरुद्धच्या उपायासंदर्भात सोनिया गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एक पत्र लिहिले आहे.
नवी दिल्ली : कोरोना व्हायरस विरुद्धच्या उपायासंदर्भात काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एक पत्र लिहिले आहे. यामध्ये त्यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काटकर करण्याच्या सूचना केल्या आहेत. कोविड-१९ विरुद्धच्या लढाईत आवश्यक प्रतिबंधात्मक उपायासंदर्भात त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना हे पत्र लिहिले आहे.
खासदारांच्या वेतनात कपात करण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयानंतर सोनिया गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मंगळवारी पत्र लिहून काटकसरीचे उपाय सूचवले आहेत. सर्वप्रथम केंद्र सरकारच्या स्तरावर निधीच्या वापरावर नियंत्रण आणले पाहिजे. सर्व परदेश दौरे स्थगित करा, अशी सूचना पंतप्रधानांना सोनिया गांधींनी केली. गेल्या पाच वर्षांमध्ये पंतप्रधान व मंत्र्यांच्या परदेश दौऱ्यांवर ३९३ कोटी रुपये खर्च झाले. परदेश दौऱ्यांच्या खर्चाची रक्कम करोना नियंत्रित आणण्याच्या उपायांसाठी वापरता येऊ शकते, असे सोनिया गांधी या पत्रात म्हटले आहे.
सरकारने तसेच सरकारी मालकीच्या कोणत्याही कंपनीने दोन वर्षांसाठी प्रसारमाध्यमांवर जाहिराती देऊ नयेत. तसेच २० हजार कोटी रुपयांच्या लुटेन्स दिल्लीच्या पुनर्बांधकामाचे आणि सौंदर्यीकरणाचे काम रद्द करावे, असं गांधी यांनी या पत्रात म्हटले आहे. केंद्र सरकारने रुग्णालय उभारण्यावर भर द्यावा, वैद्यकीय उपकरणे खरेदीला पहिले प्राधान्य दिले पाहिजे, असेही सोनिया गांधी यांनी सूचवले आहे.