नवी दिल्ली : कोरोना वायरसच्या विळख्यातून देशाला वाचवण्यासाठी पंतप्रधान मोदींनी देशभरात लॉकडाऊन जाहीर केला. नागरिकांनी एकमेकांच्या संपर्कात येऊ नये म्हणून हा निर्णय घेण्यात आला. माणसांच्या संपर्कात आल्यामुळेच हा विषाणू पसरु शकतो हे सिद्ध झाले आहे. जगातल्या सर्वच तुरुंगात कैद्यांची संख्या जास्त आहे. अशावेळी कोरोनामुळे कैद्यांच्या जीवाला मोठा धोका निर्माण झालाय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हा धोका पाहता दिल्लीतील तुरुंगातून शनिवारी ४१९ कैद्यांना सोडण्यात आले. दिल्ली तुरुंगाचे महानिरिक्षक आणि प्रवक्ता राज कुमार यांनी याबद्दल माहिती दिली. सोडण्यात येत असलेल्या ४१९ कैद्यांपैकी ३५६ कैदी हे अंतरिम जामिनातील वर्गात मोडतात. ६३ कैद्यांना आपत्कालिन पॅरॉलवर सोडण्यात आले आहे. 


अंतरिम जामिनावर कैद्याला ४५ दिवसांसाठी सोडण्यात येते. तर आकस्मिक पॅरॉलवर कैदी ८ आठवडे बाहेर राहु शकतो. तुरुंगात असलेल्या कैद्यांमध्ये सोशल डिस्टंसिंग राहावे यासाठी हा निर्णय घेण्यात आलाय. 



दिल्लीमध्ये तुरुंगात राहणाऱ्या कैद्यांची क्षमता १० हजार इतकी आहे. पण इथे १७ हजार ५०० कैदी आहेत. सोशल डिस्टंसिंग राहावे यासाठी साधारण तीन हजार कैद्यांना सोडण्याचा विचार सुरु आहे. 


दिल्लीत १८ कैद्यांना कोरोना संशयित असल्याने गर्दीपासून वेगळे ठेवण्यात आले आहे. जे कोणी नवे कैदी येत आहेत त्यांना वेगळ्या ठिकाणी स्वतंत्र ठेवण्यात आले आहे. बाहेरुन आलेल्या कैद्यामुळे आतल्या कैद्यांना धोका पोहोचू नये यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.