तिरुवनंतपुरम : देशात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असतानाच आणखी एक चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे. देशात एका नव्या विषाणूची एन्ट्री झाली आहे. केरळच्या वायनाड जिल्ह्यात नोरोव्हायरसचे रुग्ण सापडले आहेत. या प्रकरणांची पुष्टी झाल्यानंतर केरळ सरकारने लोकांना या संसर्गजन्य विषाणूपासून सावध राहण्याचं आवाहन केलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दोन आठवड्यांपूर्वी समोर आलं प्रकरण


दोन आठवड्यांपूर्वी वायनाड जिल्ह्यातील विथिरीजवळ असलेल्या पुकोडे इथल्या एका पशु वैद्यकिय महाविद्यालयातील 13 विद्यार्थ्यांना नोरोव्हायरसची लागण झाली. वैद्यकिय अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार परिस्थिती सध्या नियंत्रणात असून सुदैवाने याचा इतर विद्यार्थ्यांना संसर्ग झालेला नाही. सध्या या विषाणूबद्दल जनजागृती करण्याचं काम हाती घेण्यात आलं असून पशु वैद्यकीय महाविद्यालयात विद्यार्थ्यांची तपासणी आणि यादी केली जात आहे.


असा पसरतो व्हायरस


कोरोना व्हायरसप्रमाणेच नोरोव्हायरस देखील संसर्गजन्य आहे. यामुळे अतिसार, उलट्या, मळमळ आणि ओटीपोटात वेदना होतात. वैद्यकिय अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार संक्रमित लोकांच्या संपर्कातून व्हायरस पसरू शकतो. 


आरोग्यमंत्र्यांनी घेतली दखल


वैद्यकिय अधिकाऱ्यांनी सांगितलं की महाविद्यालयाबाहेर वसतीगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यांना सर्वात आधी नोराव्हायरसची लागण झाल्याचं समोर आलं. त्यांचे नमुणे अलाप्पुझा इथल्या विषाणू विज्ञान संस्थेत पाठवण्यात आले. राज्याचे आरोग्य मंत्री वीणा जॉर्ज यांच्या अध्यक्षतेखाली आरोग्य अधिकाऱ्यांची तातडीची बैठक झाली. या बैठकीत वायनाडमधील परिस्थितीचा आढावा घेण्यात आला. मंत्र्यांनी सर्व अधिकाऱ्यांना व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी तात्काळ उपाययोजना करण्याचे आदेश दिले आहेत.


हा आजार टाळण्यासाठी पाण्याचे स्त्रोत स्वच्छ असले पाहिजेत आणि योग्य प्रतिबंध आणि उपचाराने हा आजार लवकर बरा होऊ शकतो. प्रत्येकाने हा आजार आणि त्याच्या प्रतिबंधात्मक उपायांबद्दल जागरूक असले पाहिजे.