धक्कादायक; देशात कोरोना रुग्णांच्या संख्येत सतत वाढ
देशात आज करोनाबाधित रुग्णांची संख्या २२ लाखांच्यावर पोहोचली आहे.
मुंबई : देशात कोरोना रुग्णांच्या संख्येत सतत वाढ होताना दिसत आहे. ही बाब अत्यंत चिंताजनक आहे. गेल्या २४ तासांमध्ये भारतात ६२ हजार ६४ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर १००७ रुग्णांचा कोरोना या धोकादायक विषणूने बळी घेतला आहे. भारत आता कोरोना मृतांच्या यादीत जगात तिसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. गेल्या काही दिवसांपासून देशात कोरोना रुग्णांमध्ये होणारी वाढ भारताला तिसऱ्या स्थानावर घेऊन गेली आहे. ऑगस्ट महिन्यात जगातील सर्वाधिक कोविड-१९ चे हॉटस्पॉट समोर येत आहेत.
देशातील एकूण करोनाबाधित रुग्णांची संख्या २२ लाख १५ हजार ७५ इतकी झाली आहे. त्यापैकी ६ लाख ३४ हजार ९४५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. दिलासादायक बाब म्हणजे आतापर्यंत १५ लाख ३५ हजार ७४४ रुग्णांनी कोरोनावर मात केली असून ४४ हजार ३८६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
दरम्यान, महाराष्ट्र, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, कर्नाटक, दिल्ली आणि उत्तर प्रदेशमध्ये कोरोना रुग्णांची संख्या सतत वाढत आहे. त्यामुळे सर्वत्र चिंताग्रस्त वातावरण आहे. शिवाय काही राज्यांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली.
देशात १० राज्य अशी आहेत ज्याठिकाणी कोरोना संसर्गाचं प्रमाण ८० टक्के अधिक आहे. पण ही संख्या देखील लवकरच नियंत्रणात येण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचं आरोग्य मंत्रालयाने सांगितलं आहे.