Corona : महाराष्ट्रापुढे गेलं हे राज्य, सर्वाधिक रुग्णांची नोंद
देशभरामध्ये कोरोनाचं संकट दिवसेंदिवस वाढत चाललं आहे.
मुंबई : देशभरामध्ये कोरोनाचं संकट दिवसेंदिवस वाढत चाललं आहे. देशभरामध्ये कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या ४१५च्या वर गेली आहे. आतापर्यंत महाराष्ट्रात कोरोनाचे सर्वाधिक ८९ रुग्ण आढळले होते. पण आता सर्वाधिक रुग्णांच्याबाबतीत केरळने महाराष्ट्राला मागे टाकलं आहे.
केरळमध्ये आज कोरोनाचे २८ नवे रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे केरळमधली कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या ९५ झाली आहे. यातल्या ४ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे, तर उरलेल्या ९१ रुग्णांवर उपचार सुरु आहेत, अशी माहिती केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी दिली आहे.
कोरनाग्रस्तांची वाढती संख्या लक्षात घेता संपूर्ण केरळमध्ये लॉकडाऊन करण्यात आलं आहे. केरळ राज्याच्या सगळ्या सीमा बंद करण्यात आल्या आहेत. तसंच सार्वजनिक परिवहन आणि प्रार्थना स्थळंही बंद ठेवण्यात येणार आहेत. केरळमध्ये आज रात्रीपासून ३१ मार्चपर्यंत लॉकडाऊन करण्यात येणार आहे. मेडिकल दुकानांशिवाय इतर दुकानं सकाळी ७ ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत सुरू राहतील.
महाराष्ट्रामध्ये आज कोरोनाचे ११ नवे रुग्ण आढळले आहेत. तर मुंबईत फिलिपिन्सच्या ६८ वर्षांच्या माणसाचा मृत्यू झाला आहे. देशभरामध्ये कोरोनामुळे आतापर्यंत ७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये मुंबईत ३ जणांनी आपले प्राण सोडले. तर कर्नाटकमधील कलबुर्गी, बिहारमधील पटना, सुरत, कोलकाता आणि दिल्लीमध्ये प्रत्येकी एक व्यक्ती कोरोनामुळे मरण पावली.