तळीरामांना प्रयोग भोवले! दारूऐवजी सॅनिटायजर प्यायल्यामुळे तिघांचा मृत्यू
लॉकडाऊनमध्ये दारू मिळत नसल्यामुळे तळीराम ती कोणत्या ना कोणत्या मार्गाने मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत.
चेन्नई : लॉकडाऊनमध्ये दारू मिळत नसल्यामुळे तळीराम ती कोणत्या ना कोणत्या मार्गाने मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. काहींनी तर हॅण्ड सॅनिटायजरमध्ये अल्कोहोल असल्यामुळे ते नशेसाठी वापरण्याचा प्रयत्न केला. पण हा प्रयोग त्यांच्या जीवावर बेतला आहे.
लॉकडाऊनमध्ये दारूची दुकानं बंद असल्यामुळे तळीरामांची तळमळ सुरू आहे. दारू मिळण्यासाठी दारूची दुकानं आणि एक्साईजची गोदामं फोडण्यापर्यंत तळीरामांची मजल गेली आहे. नागपुरात तर मेडिकलमधून दारू विकली गेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तर गोंदियातल्या बार मालकाने स्वत:चा बार फोडला गेल्याचा बनाव करून दारू विकली.
तामीळनाडूच्या चंगरपट्टू शहरात तर तळीरामांनी कहर केला. हॅण्ड सॅनिटायजरमध्ये अल्कोहोल असल्याचं त्यांना समजलं. मग या तिघांनी दारू मिळत नसल्याने हॅण्ड सॅनिटायजरकडे आपला मोर्चा वळवला. हॅण्ड सॅनिटायजर प्यायल्यामुळे या तिघांचा मृत्यू झालाय.
हॅण्ड सॅनिटायजरमधलं अल्कोहोल आणि विस्की-रममधलं अल्कोहोल यात जमीन-आसमानाचा फरक असल्याचं डॉक्टर सांगतात. लॉकडाऊन ही संधी समजून दारू पिऊच नका, त्यानिमित्ताने दारूसारखं व्यसन सुटेल. सॅनिटायजर किंवा नशेचे शॉर्टकट अवलंबून स्वत:चा जीव धोक्यात घालू नका.