Corona Update: चिंता वाढली! देशावर पुन्हा कोरोनाचं सावट; आरोग्य विभागनं स्पष्टच म्हटलं...
Coronavirus: काढता पाय घेतलेला कोरोना आता पुन्हा माघार घेताना दिसत आहे. अनेक राज्यांमध्ये नव्यानं कोरोना रुग्ण आढळल्यामुळं आरोग्य विभागाच्या चिंतेत भर
Coronavirus News : जवळपास तीन वर्षे पाठलाग करणाऱ्या कोरोनानं आता कुठं पाठ सोडली असतानाच आता पुन्हा एकदा या संक्रमणाचा धोका बळावताना दिसत आहे. भारतात कोरोना रुग्णसंख्या पुन्हा एकदा वाढत असल्यामुळं आरोग्य विभागही सदरील परिस्थितीमुळं सतर्क झाला आहे. ज्यामुळं नागरिकांमध्येही आता भीतीचं वातावरण पाहायला मिळत आहे.
तिथं सिंगापूरमध्ये कोविड 19 च्या सब व्हेरिएंट केपी2 आणि केपी 1 चा संसर्ग वाढल्यामुळं रुग्णसंख्येमध्ये झपाट्यानं वाढ होताना दिसत आहे. भारतातही सिंगापूरमधील हा व्हेरिएंट संसर्गबाधितांची संख्या वाढवताना दिसत असून, आयएनएसएसीओजीच्या आकड्यांनुसार केपी.2 चे 290 आणि केपी.1 34 नवे रुग्ण आढळले आहेत.
हेसुद्धा वाचा : Maharashtra Weather News : कुठवर पोहोचला मान्सून? मुंबईत ढगाळ वातावरण, राज्यासाठी काय आहे हवामान विभागाचा इशारा?
देशातील आरोग्य विभागाच्या वतीनं कोरोनाच्या नव्या सब व्हेरिएंटच्या रुग्णांमध्ये वाढ झाल्याच्या वृत्ताला दुजोरा देण्यात आला आहे. अधिकृत आकडेवारीमुळं यासंदर्भातील माहिती समोर आली असून, सध्या या व्हेरिएंटचे सर्वाधिक रुग्ण सिंगापूरमध्ये दिसत असून, भारतातील रुग्णसंख्येवरही आरोग्य विभाग लक्ष ठेवून आहे. सध्या देशात सदर स्थितीमुळं चिंतेचं वातावरण असलं तरीही हा संसर्ग अद्याप गंभीर टप्प्यावर पोहोटला नसून अनेक रुग्णं घरच्या घरी बरे होत असल्याचं लक्षता येत आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार ही परिस्थिती घाबरवणारी नसून, कोणत्याही विषाणूच्या संरचनेत बदल होणं हा विषाणूंचा नैसर्गिक गुण आहे. सध्या या नव्या व्हेरिएंटचे गुजरातमध्ये दोन, महाराष्ट्रात चार, राजस्थानमध्ये दोन आणि उत्तराखंडमध्ये एक रुग्ण आढळले असून, एकट्या पश्चिम बंगालमध्ये केपी.1 या सब व्हेरिएंटचे 23 रुग्ण आढळले आहेत. तर, केपी.2 चे सर्वाधिक 148 रुग्ण महाराष्ट्रात आढळले आहेत. याशिवाय दिल्लीमध्ये 12, गुजरातमध्ये 23, हरियाणामध्ये तीन आणि कर्नाटकमध्ये चार, ओडिशामध्ये 17, राजस्थानमध्ये 21, मध्य प्रदेशात 1, उत्तर प्रदेशात 8, उत्तराखंडमध्ये 16 आणि पश्चिम बंगालमध्ये 36 रुग्णांना संसर्ग झाल्याचं वृत्त आहे.