देशात आतापर्यंत १ कोटी ४ लाख ७३ हजार ७७१ कोरोना चाचण्या
देशातील कोरोना रूग्णांची संख्या साडेसात लाखांवर पोहचली आहे.
नवी दिल्ली : देशातील कोरोना रूग्णांची संख्या साडेसात लाखांवर पोहचली आहे. बुधवारी सकाळी आरोग्य मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या अद्ययावत माहितीनुसार देशात एकूण रुग्णांची संख्या 7 लाख 42 हजार 417 आहे, ज्यामध्ये 20 हजार 642 लोकांचा मृत्यू झाला आहे. गेल्या 24 तासांत 22 हजार 752 नवीन रुग्णांची नोंद झाली असून 482 लोकांचा मृत्यू झाला आहे.
आतापर्यंत 4 लाख 56 हजार 831 लोकांनी कोरोनावर मात केली आहे. तर 2 लाख 64 हजार 944 रुग्ण अजूनही उपचार घेत आहे. आयसीएमआरच्या आकडेवारीनुसार देशात 7 जुलैपर्यंत एक कोटी 4 लाख 73 हजार 771 नमुन्यांची चाचणी घेण्यात आली आहे. काल म्हणजेच 7 जुलै रोजी विक्रमी 2 लाख 62 हजार 679 चाचण्या घेण्यात आल्या आहेत.
दरम्यान, महाराष्ट्रातील हॉटेल व्यवसायावरील लॉकही उघडत आहे. कोरोना संसर्ग आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर असताना महाराष्ट्रातील सर्व निर्बंध हटविले जात आहेत. मुंबईत संसर्गाची पातळी स्थिर असली तरीही महाराष्ट्रात दररोज वाढणारी रुग्ण संख्या रेकॉर्डमध्ये नोंदली जात आहेत.
शनिवारी महाराष्ट्रात 7074 नवीन रुग्ण आढळले, रविवारी 6555, सोमवारी 5368 आणि मंगळवारी 5134 रुग्णांची नोंद झाली. महाराष्ट्रातील एकूण रुग्णांची संख्या 2,17,121 वर पोहोचली आहे. त्यापैकी 89 हजार 294 रुग्ण अजूनही उपचार घेत आहे. राज्यात आतापर्यंत 9250 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
संक्रमणाच्या या भीषण काळात बीएमसीने कोरोना तपासणीसंदर्भातील सर्व अटी दूर केल्या आहेत. आत्तापर्यंत कोरोना चाचणीसाठी डॉक्टरांचं प्रिस्कीपशन आवश्यक होते, परंतु आता कोणालाही कोरोना टेस्ट करता येणार आहे. मुंबईकरांसाठी देखील एक चांगली बातमी आहे की, कित्येक आठवड्यांपासून कोरोना हॉटस्पॉट असलेल्या धारावी झोपडपट्टीतील परिस्थिती सुधारत आहे.