नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी देशातील कोविड 19 मुळे उद्भवलेल्या परिस्थितीचा आढावा घेतला. पंतप्रधानांना 1 लाखाहून अधिक सक्रिय प्रकरणं असलेल्या 12 राज्यांची सविस्तर माहिती देण्यात आली. याखेरीज ज्या राज्यांमधील संसर्गामुळे अधिक मृत्यू होत आहेत अशा जिल्ह्यांची माहितीही त्यांना दिली. या राज्यांच्या मदतीसाठी आणि आरोग्य व्यवस्था बळकट करण्यासाठी त्यांना मार्गदर्शक सूचनाही देण्यात याव्यात असे पंतप्रधानांनी निर्देश दिले. पंतप्रधान कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, पंतप्रधानांनी आरोग्य सुविधा आणखी बळकट करण्यासाठी राज्यांमार्फत होत असलेल्या कामांचा तपशील घेतला. याशिवाय त्यांनी बाधित राज्यांमध्ये लसीकरण व औषधांचा साठा किती आहे याचा देखील आढावा घेतला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पंतप्रधानांनी कोरोनामुळे संवेदनशील परिस्थिती असलेल्या राज्यांचा उल्लेख केला आणि म्हणाले की या ठिकाणी लसीकरण प्रक्रियेची गती कमी केली जाऊ नये. लॉकडाऊन असूनही लोकांना लसीकरण देण्यात यावे आणि लसीकरण करणार्‍या आरोग्य सेवा कर्मचार्‍यांना इतर कोणत्याही कर्तव्यावर पाठवू नये. याशिवाय कोरोना लसीकरणबाबत ही पंतप्रधानांनी माहिती घेतली. पंतप्रधानांना सांगण्यात आले की 45 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या 31 टक्के लोकांना आतापर्यंत लस दिले गेली आहे.


पंतप्रधानांनी औषधांच्या उपलब्धतेचा आढावा घेतला. रेमडेसिव्हिरसह सर्व औषधांच्या निर्मिती प्रक्रियेस वेग देण्याच्या सूचना त्यांनी केल्या. पंतप्रधानांनी लसीकरणातील प्रगती व पुढील काही महिन्यांत तयार होणार्‍या औषधांच्या निर्मितीचा आढावाही घेतला. त्यांना सांगितले गेले की सुमारे 17.7 कोटी लस राज्यात पुरविली जातील. 10 टक्के किंवा त्याहून अधिक संसर्ग झालेल्या जिल्ह्यांची ओळख पटविण्यासाठी राज्यांना सूचना करण्यात आल्याचं देखील पंतप्रधानांनी नमूद केले.


या बैठकीत संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, गृहमंत्री अमित शहा, अर्थमंत्री निर्मला सीतारमण, आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन, केंद्रीय मंत्री पियुष गोयल, मनसुख मंडाविया आणि अन्य मंत्री उपस्थित होते.


आज सकाळी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या 24 तासांत भारतात संसर्गाची 4,12,262 नवीन प्रकरण पुढे आली आहेत. देशात 3,980 लोकांचा मृत्यू झाला आहे. देशात संक्रमित लोकांची एकूण संख्या 2,10,77,410 पर्यंत वाढली आहे आणि एकूण मृतांचा आकडा 2,30,168 वर पोहोचला आहे.