कोरोना बाधित बाहेर पडला, शेजाऱ्यांनी संपूर्ण कुटुंबाला घरात डांबले
देशात कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. (Coronavirus in Maharashtra) कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाची धडकी अनेकांनी घेतली आहे.
मुंबई : देशात कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. (Coronavirus in Maharashtra) कोरोना लसीकरण करण्यात येत आहे. मात्र, सध्या औषध आणि ऑक्सिजनचा तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे लोकांच्या मनात कोरोनाबाबत ( Corona Positive) अधिक भीती निर्माण झाली आहे. कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाची धडकी अनेकांनी घेतली आहे. त्याचे एक उदाहरण आंध्र प्रदेशमध्ये (Andhra Pradesh) पाहायला मिळाले आहे. कोरोनाबाधिताला घरात क्वारंटाईन करण्यात आले होते. मात्र, हा बाधित घराबाहेर पडल्यानंतर तेथील शेजाऱ्यांनी कोरोना पॉझिटिव्ह ( Corona Positive) जोडप्याला त्याच्या घरात कैद केले.
स्थानिकांचा आरोप आहे की, पीडितेच्या कुटुंबाने कोविड-19चा नियम तोडला, त्यामुळे त्यांना हे पाऊल उचलण्यास भाग पाडले. गुरुवारी आंध्र प्रदेशात राज्यात कोरोना संसर्गाची (Infection) 10,759 नवीन रुग्णसंख्या नोंदविण्यात आली आहेत. गेल्यावर्षी 10 सप्टेंबरपासून एका दिवसात ही सर्वाधिक नोंद झाली आहे. यासह राज्यात संसर्ग झालेल्यांची संख्या वाढून 9,97,462 झाली आहे.
शेजारीही पहरा देत आहेत
‘द सन’च्या वृत्तानुसार ही घटना आंध्र प्रदेशातील नेल्लोरची आहे. येथील एमआरएम रेसिडेन्सी अपार्टमेंटमध्ये राहणारे एक जोडपे कोरोना पॉझिटिव्ह आहे. शेजाऱ्यांनी सांगितले की, कोरोनाबाधित असल्याने त्यांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. असे असताना पीडितेच्या कुटुंबीयांनी कोविड आणि क्वारंटाईनचे नियम तोडले आणि घराबाहेर गेले. यामुळे त्यांना कठोर पावले उचलावी लागली. शेजारच्यांनी पीडितेच्या घराला बाहेरुन कुलूप लावले. ज्यामुळे ते पुन्हा बाहेर पडू नयेत ही अपेक्षा होती. एवढेच नव्हे तर समाजातील काही लोक पीडितेच्या घराबाहेर पहारेदेखील ठेवत आहेत.
पीडितांनी सांगितली असहाय्यता
त्याचवेळी पीडित कुटुंबातील महिलेने सांगितले की, तिचा नवरा सोमवारी रात्री गरज होती म्हणून घराबाहेर पडला होता. कारण काही औषधे घ्यावी लागत होती आणि आम्हाला मदत करायला इथे कोणी नव्हते. या महिलेने सांगितले की, मंगळवारी सकाळी जेव्हा आम्हाला बाहेरुन दरवाजा बंद असल्याचे आढळले तेव्हा आम्ही पोलिसांना कळविले. पोलिसांनी येऊन कुलूप उघडले आणि शेजार्यांशी बोलले. या घटनेनंतर पीडितेचे कुटुंब घाबरले आहे, त्यांना भीती वाटते की शेजारी पुन्हा असे कृत्य करु शकतात.
'हे प्रत्येकासाठी धोकादायक आहे'
रिपोर्टमध्ये सांगितले गेले आहे, सोमवारी रात्री कोरोना पॉझिटिव्ह व्यक्ती घरी परतत असताना सोसायटीत राहणाऱ्या एका कुटुंबाने त्याला पाहिले. यानंतर त्यांनी तातडीने सोसायटीच्या इतर लोकांना माहिती दिली. संतप्त शेजार्यांनी पीडितेच्या लोखंडी दरवाजाला बाहेरून कुलूप लावले आणि काही लोकांना तिथे पहारा देण्यासाठी बसवले. अशा प्रकारे कोरोना-संक्रमित व्यक्तीच्या घराबाहेर जाणे प्रत्येकासाठी धोकादायक ठरु शकते, असे सोसायटीचे सदस्य सांगतात.