मुंबई : कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रसारामध्येच बरे झालेल्या रुग्णांचे रिपोर्ट पुन्हा पॉझिटिव्ह यायला सुरुवात झाली आहे. अनेक देशांमध्ये उपचारानंतर बऱ्या झालेल्या रुग्णांची कोरोना टेस्ट पुन्हा पॉझिटिव्ह आल्याचे प्रकार समोर आले. यानंतर संशोधकांनी याबाबत संशोधनही केलं. कोरोनातून बऱ्या झालेल्या रुग्णाचे रिपोर्ट काही आठवड्यांनंतर पॉझिटिव्ह आले, तरी याचा धोका नाही, असा दावा संशोधकांनी केला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दक्षिण कोरियाच्या सेंटर ऑफ डिसीज कंट्रोल एण्ड प्रिव्हेन्शनच्या वैज्ञानिकांनी याबाबत संशोधन केलं. बऱ्या झालेल्या रुग्णांच्या शरिरामध्ये कोरोना व्हायरसचे मृत कण असू शकतात, त्यामुळे हा रिपोर्ट पॉझिटिव्ह येतो, पण यामुळे संक्रमणाचा धोका नसतो, असं शास्त्रज्ञांच्या संशोधनात समोर आलं. 


सेंटर ऑफ डिसीज कंट्रोल ऍण्ड प्रिव्हेन्शनने २८५ रुग्णांचे सॅम्पल घेतले. या सॅम्पलची पीसीआर टेस्ट करण्यात आली. यानंतर याला लॅबमध्ये कल्चर करण्यात आलं. कल्चर केल्यानंतर यामध्ये कोणत्याही प्रकारची वाढ दिसली नाही. त्यामुळे कोरोनाचं संक्रमण होत नसल्याचं सिद्ध होत असल्याचं संशोधकांनी सांगितलं. 


दक्षिण कोरियाने बरे झालेल्या रुग्णांच्या टेस्टसाठी नवी गाईडलाईन जाहीर करण्यात आली आहे. कोरोनातून बऱ्या झालेल्या रुग्णांना शाळा किंवा ऑफिसमध्ये जायच्या आधी त्यांचे निगेटिव्ह टेस्ट रिपोर्ट दाखवणं गरजेचं आहे. 


बरे झालेले रुग्ण पॉझिटिव्ह का येतात?


आयसीएमआरचे डॉक्टर गंगाखेडकर यांनी दिलेल्या माहितीनुसार रुग्णाला डिस्चार्ज करण्यासाठी २ आरटीपीसीआर टेस्ट २४ तासांमध्ये निगेटिव्ह याव्या लागतात. अनेकवेळा रुग्ण बरा झाल्यानंतरही आरटीपीसीआर टेस्ट निगेटिव्ह येत नाहीत, त्यामुळे रुग्ण हॉस्पिटलमध्येच राहतात. गळ्याच्या ज्या पेशींमध्ये विषाणू राहतो त्या पेशींचं आयुष्य ३ महिने असतं. व्हायरस मेल्यानंतरही तो या पेशींमध्ये असतो. मेलेला व्हायरस शरिरात राहिल्यामुळे टेस्ट पॉझिटिव्ह येते.


व्हायरस जिवंत आहे का मेला कसं कळतं?


उपचारानंतर शरिरातला व्हायरस जिवंत आहे का मेलेला हे पाहण्यासाठी अनेक ठिकाणी अभ्यास करण्यात आला आहे. बऱ्या झालेल्या रुग्णाला ३ दिवस लक्षणं दिसली नाहीत, तर त्याच्या गळ्याचं सॅम्पल घेतलं जातं आणि व्हायरस कल्चर केलं जातं. जर कल्चर केल्यानंतर व्हायरस आपल्यासारखेच अनेक व्हायरस तयार करत असेल, तर व्हायरस जिवंत आहे. पण जर असं होत नसेल, तर शरिरातला व्हायरस मेलेला आहे आणि या व्हायरसमुळे प्रसार होत नाही. 


भारतातली नवीन डिस्चार्ज पॉलिसी काय?


आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या नव्या डिस्चार्ज पॉलिसीनुसार हलकी लक्षणं असलेल्या रुग्णांना १० दिवसात डिस्चार्ज दिला जाऊ शकतो. याशिवाय ३ दिवस ताप येत नसेल, तरीही रुग्णाला घरी पाठवता येईल. यासाठी डिस्चार्जआधी कोरोना टेस्ट करणं बंधनकारक नाही. डिस्चार्ज केल्यानंतर रुग्णाला ७ दिवस सेल्फ आयसोलेशनमध्ये राहण्याचा सल्ला दिला जातो.


एम्सचे डायरेक्टर डॉक्टर रणदीप गुलेरिया सांगतात, 'पहिले आम्ही रुग्णांना ३ ते ४ आठवडे डिस्चार्ज देत नव्हतो, कारण त्यांच्या टेस्ट वारंवार पॉझिटिव्ह येत होत्या. टेस्ट पॉझिटिव्ह आल्या तरी त्यांना काहीही त्रास होत नव्हता. आता रुग्णांच्या शरिरात मेलेला व्हायरस अनेक आठवडे असतो, असं आता समोर आलं आहे, पण यामुळे कोरोनाचा प्रसार होत नाही.'