Covid 19: देशात कोरोनाचा नवा सब व्हेरिएंट JN 1 च्या प्रकरणांमध्ये सातत्याने वाढ होताना दिसतेय. संपूर्ण देशभरात या JN 1 सब व्हेरिएंटच्या रूग्णांची आकडेवारी हजाराच्या पार गेली असल्याची माहिती आहे. यामध्ये एकूण 16 राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांचा समावेश आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'Indian SARS-CoV-2 Genomics Consortium' (INSACOG) ने ही माहिती दिल्यानुसार, कर्नाटकात या सब व्हेरिएंटच्या सर्वाधिक रूग्णांची नोंद करण्यात आली आहे. त्यानुसार या ठिकाणी 214 प्रकरणं नोंदवण्यात आली आहेत. यानंतर तर महाराष्ट्रात 170, केरळमध्ये 154, आंध्र प्रदेशात 189, गुजरातमध्ये 76, गुजरातमध्ये 88 अशा रुग्णांची नोंद झाली आहे. तर तामिळनाडू आणि गोव्यात 90 आढळून आले आहेत.


याशिवाय तेलंगणा आणि राजस्थानमध्ये JN.1 सब व्हेरिएंटच्या रूग्णांची 32 प्रकरणं नोंदवण्यात आली आहेत. छत्तीसगडमधील JN.1 ची 25, दिल्लीतील 16, उत्तर प्रदेशातील सात, हरियाणामधील पाच, ओडिशातील तीन, पश्चिम बंगालमधील दोन आणि उत्तराखंडमधील एकाला JN.1 ची लागण झाल्याचं समोर आलं आहे. 


JN.1 च्या 1104 रूग्णांची नोंद


आत्तापर्यंत JN 1 देशातील 16 राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये पसरला असल्याची माहिती आहे. त्यामुळे देशात एकूण 1104 प्रकरणं आढळून आली आहेत. या रूग्णांच्या संख्येचा आकडा हजारापार गेल्याने आरोग्य विभागाची चिंता वाढली आहे. 


केंद्राने राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये होणाऱ्या कोरोनाच्या प्रकरणांमध्ये वाढ लक्षात घेता राज्यांना विनंती करण्यात आली आहे की, त्यांनी कोविड-19 च्या मार्गदर्शक तत्त्वांचे प्रभावी पालन करावं. राज्यांना सर्व आरोग्य केंद्रांवर इन्फ्लूएंझा आणि गंभीर श्वासोच्छवासाच्या गुंतागुंतीच्या प्रकरणांचे नियमितपणे निरीक्षण करण्यास सांगण्यात आलंय. शिवाय या सर्व गोष्टींचा जिल्हावार अहवाल पाठवण्यास सांगितलाय. जेणेकरून प्रकरणांमध्ये वेगाने वाढ होत आहे यावर लक्ष ठेवता येईल.


कोरोनावर नियंत्रण राखण्यासाठी महाराष्ट्र सरकार अलर्टवर


कोरोनावर नियंत्रण राखण्यासाठी राज्य सरकार विशेष खबरदारी घेताना दिसतंय. यासाठी टास्क फोर्सही स्थापन करण्यात आला आहे. शुक्रवारी डॉ. रमण गंगाखेडकर यांच्या अध्यक्षतेखाली या टास्क फोर्सची बैठक झाली. या बैठकीत सहव्याधी असलेल्या कोरोना रुग्णांना रेमेडिसिविर देण्याचा सल्ला टास्क फोर्सने दिला. या बैठकीत कोरोना रुग्णांना कोणती औषधं आणि इंजेक्शन देण्यात यावे? याबाबत मार्गदर्शन सूचना जारी करण्यात आल्या.