नवी दिल्ली : देशात कोरोना संसर्गाने भयावह रुप घेतले आहे. मार्चमध्ये कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. तर दर मिनिटाला 50 नवे कोरोना रुग्णांची नोंद होत असल्याची आकडेवारी समोर आली आहे. गेल्या वर्षी 11 ऑक्टोबर नंतर काल (1 एप्रिल ) रोजी देशातील उच्चांकी कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 
गुरूवारी ( 1 एप्रिल ) 11 ऑक्टोबरनंतर देशात कोरोनाची सर्वात मोठी वाढ पाहायला मिळाली आहे. आज देशात कोरोनाच्या 72,330 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. यावर्षी प्रथमच, एकाच दिवशी इतक्या मोठ्या संख्येने संसर्ग झाल्याचे आढळले आहे. आतापर्यंत एकूण संक्रमणाची संख्या 1,22,21,665 झाली आहे. 11 ऑक्टोबर 2020 रोजी 74,383 रुग्णांची नोंद झाली आहे.


आरोग्य मंत्रालयाने गुरुवारी सकाळी आठ वाजता जाहीर केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, कोरोनामुळे आतापर्यंत 1,62,927 लोकांचा मृत्यू झाला आहे. गेल्या 24 तासात 459 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सलग २२व्या दिवशी संक्रमणाचे प्रमाण वाढतच आहे. यामुळे सक्रिय रुग्णांची संख्या 5,84,055 वर वाढली आहे. हे एकूण संक्रमणाच्या 4.78 टक्के आहे. 


देशात रिकव्हरी रेट 93.89 टक्क्यांपर्यंत खाली आला आहे. यावर्षी 12 फेब्रुवारी रोजी 1,35,926 सक्रिय रुग्णांची नोंद झाली होती. जी एकूण संक्रमणांच्या 1.25 टक्के होती. आतापर्यंत 1,14,74,683 लोकांनी कोरोनावर मात केली आहे, यासह मृत्यूचे प्रमाण 1.33 टक्क्यांवर गेली आहे.


7 ऑगस्ट रोजी देशात कोरोना संक्रमणाची संख्या 20 लाखांच्या पुढे गेली. तर 16 सप्टेंबरला 50 लाखांचा आकडा गाठला. 19 डिसेंबरला हा आकडा एक कोटींच्या वर गेला आहे.


आयसीएमआरनुसार 31 मार्चपर्यंत देशात 24,47,98,621 नमुन्यांची चाचणी घेण्यात आली आहे. बुधवारी 11,25,681 नमुन्यांची चाचणी घेण्यात आली.


सर्वाधिक मृत्यू महाराष्ट्रात


गेल्या 24 तासांत मृत्यू झालेल्या 459 लोकांपैकी 227 जण हे एकट्या महाराष्ट्रातील आहेत. त्याचप्रमाणे पंजाबमध्ये 55, छत्तीसगडमध्ये 39, कर्नाटकात 26, तामिळनाडूमध्ये 19, केरळमध्ये 15 आणि दिल्ली आणि उत्तर प्रदेशात 11-11 लोकांचा मृत्यू झाला.