VIDEO: नोएडात कोरोनाचा वेगाने फैलाव; योगी आदित्यनाथांनी सरकारी अधिकाऱ्याला झापले
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी विशेष अधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती.
नवी दिल्ली : संपूर्ण जगात कोरोनाचा फैलाव मोठ्या प्रमाणात होत आहे. दरम्यान उत्तर प्रदेशच्या काही भागांमधून चांगल्या-वाईट बातम्या कानावर येत आहेत. मंगळवारी सकाळी बरेली मध्ये नवीन ५ कोरोनाग्रस्त रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे आता उत्तर प्रदेशात कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांमध्ये वाढ होवून संख्या १०२ वर पोहोचली आहे. तर कोरोनाची लागण झालेले तीन रुग्ण बरे झाले आहेत. त्यांना घरी देखील पाठवण्यात आले आहे. त्यातील दोन रुग्ण नोएडाचे तर एक रुग्ण आग्र्याचा होता.
पण नोएडामध्ये कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या वाढत आहे. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी विशेष अधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती. या बैठकी दरम्यान एका सरकारी अधिकाऱ्याने त्यांच्याकडे ही सर्व परिस्थित नियंत्रणात आल्यानंतर तीन महिन्यांची रजा मागितली होती. अधिकाऱ्याच्या या मागणीनंतर योगी आदित्यनाथांनी सरकारी अधिकाऱ्याला झापले. यादरम्याचा व्हिडियो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.
गौतम बुद्ध नगरचा एक भाग असलेल्या नोएडा मध्ये ९६ पैकी ३८ COVID-19चे रुग्ण आहेत. त्यामुळे सरकारी अधिकाऱ्याच्या अशा वागणुकीवर आदित्यनाथ यांनी राग व्यक्त केला. त्यामुळे जिल्हा दंडाधिकारी बी.एन.सिंग यांच्या जागी २००७ बॅचचे आयएएस अधिकारी सुहास ललिनाकेरे यथीराज यांची नेमणूक करण्यात आली आहे.
संपूर्ण भारतामध्ये कोरोना रुग्णांचा आकडा १ हजार १००वर पोहोचला आहे. शिवाय २९ जणांचा या धोकादायक विषाणूमुळे मृत्यू झाला आहे. या धोकादायक विषाणूसह लढण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी संपूर्ण देशात १४ एप्रिल पर्यंत लॉकडाऊनची घोषणा केली आहे.