Covid-19: गेल्या काही दिवसांमध्ये कोरोनाच्या रूग्णांमध्ये वाढ झाल्याचं दिसून येतंय. कोरोनाच्या रूग्णांमध्ये होणाऱ्या वाढीमुळे आरोग्य विभागाची चिंता वाढली आहे. देशात गेल्या 24 तासांमध्ये 605 नव्या कोरोनाच्या रूग्णांची नोंद झाली आहे. तर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी 2 रूग्णांचा केरळमध्ये आणि 2 रूग्णांचा कर्नाटकमध्ये मृत्यू झाल्याची नोंद आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, एकूण एक्टिव्ह प्रकरणांची संख्या सोमवारी 3,919 वरून 3,643 वर घसरली आहे. देशातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या 4,50,19,819 वर पोहोचली आहे. यावेळी एकूण मृतांची संख्या 5,33,406 वर पोहोचली आहे.


राज्यात JN.1 ची प्रकरणं वाढतायत


राज्यात कोरोनाचा नवा सब व्हेरिएंट JN.1 ची प्रकरणं वाढताना दिसतायत. महाराष्ट्रात जेएन.1 प्रकरणांची संख्या 200 च्या पुढे गेली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 6 जानेवारीपर्यंत देशभरातील 12 राज्यांमधून JN.1 चे एकूण 682 प्रकरणे नोंदवली गेली आहेत.


सध्या दिसून येणारा JN.1 सब व्हेरिएंट हा ओमायक्रॉनचा वंशज आहे. त्याला यापूर्वी BA.2.86 किंवा पिरोला नावाने ओळखलं जात होतं. केरळमध्ये पहिल्यांदा याचा रिपोर्ट करण्यात आला होता. 


INSACOG ने दिलेल्या माहितीवरून असं दिसून आलंय की, डिसेंबर 2023 मध्ये 239 आणि नोव्हेंबर 2023 मध्ये 24 कोविड प्रकरणं JN.1 च्या व्हेरिएंटची असल्याचं निश्चित करण्यात आलंय. एकूण 4.4 कोटी लोक कोविडमधून बरे झाले आहेत. तर राष्ट्रीय रिकव्हरी रेट 98.81 टक्के आहे. उपलब्ध आकडेवारीनुसार, देशात कोविड लसींचे एकूण 220.67 कोटी डोस देण्यात आले आहेत.