नवी दिल्ली : देशभरात कोरोनाचा संसर्ग वाढतानाच दिसत आहे. अनेक शहरांमध्ये अतिगंभीर विभाग (हॉटस्पॉट) ची संख्या वाढतानाच दिसत आहे. हे पाहता सरकारने चाचण्या केंद्र वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. आरोग्य विभागार्फे याला व्यापक स्वरुप देण्यात येणार आहे. देशाच्या कानाकोपऱ्यात चाचण्या केंद्रांचे जाळे उभारण्याचा आयसीएमआर (ICMR) संकल्प आहे. यासाठी त्यांनी सुरुवात देखील केली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


असा आहे प्लान 


देशभरात कोरोनाची चाचण्या करणाऱ्या केंद्राचा शोध घेण्यास आयसीएमआरने सुरुवात केली आहे. यासाठी खासगी तसेच सरकारी मेडिकल कॉलेजमधून अर्ज मागविण्यात आले आहेत. देशात ज्या खासगी अथवा सरकारी मेडिकल कॉलेजकडे कोविड-१९ ची चाचणी करण्यालायक साधनसामुग्री असेल त्यांनाच या नेटवर्कमध्ये सहभागी करुन घेण्यात येणार आहे. 


आयसीएमआरच्या १४४ सरकारी लॅब सध्या देशभरात कोरोना संसर्गाची चाचणी करत आहेत. यासोबतच खासगी व्यक्तींची संख्या वाढवण्यास सरकारने मंजुरी दिली आहे. 


देशात प्रत्येक दिवसाला १५ ते १६ हजार चाचण्या केल्या जात आहेत. यासाठी जास्त चाचणी केंद्राची गरज असून हे नेटवर्क वाढवण्याचा प्रयत्न होत आहे.


आयसीएमआरचे पत्र 


AIIMS सहित देशातील १४ मेडिकल संशोधन संस्थांना सेंटर ऑफ एक्सीलंसचा दर्जा देऊन त्यांच्या संचालकांची एक टीम बनवण्यात आली आहे. यामध्ये वेगवेगळ्या संचालकांना वेगवेगळी जबाबदारी देण्यात आली आहे. ही टीम देशभरातील वेगवेगळ्या लॅब आणि त्यासंदर्भातील व्यवस्थांची पाहणी करेल.


कोरोनाग्रस्तांची संख्या वाढली


देशभरामध्ये कोरोनाग्रस्तांची संख्या ८,३५६वर पोहोचली आहे. मागच्या २४ तासामध्ये कोरोनामुळे ३४ लोकांचा मृत्यू झाला आहे, तर ९०९ नवे रुग्ण सापडले आहेत. कोरोनामुळे आत्तापर्यंत २७३ जणांचा मृत्यू झाला आहे, तर ७१६ जण पूर्णपणे बरे होऊन घरी परतले आहेत. आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अग्रवाल यांनी ही माहिती दिली आहे.


२९ मार्चला कोरोनाग्रस्तांची संख्या ९७९ एवढी होती, ती आता ८,३५६ पर्यंत पोहोचली आहे. एकूण रुग्णांपैकी २० टक्के रुग्णांना आयसीयू आणि व्हॅन्टिलेटरची गरज आहे. जवळपास १,०७६ रुग्णांना ऑक्सिजन व्हॅन्टिलेटर आणि आयसीयूची गरज पडेल, असं लव अग्रवाल यांनी सांगितलं.


आयसीयू व्हॅन्टिलेटर आणि दुसऱ्या वैद्यकीय उपकरणांवरून गोंधळ होऊ नये, म्हणून आरोग्य मंत्रालयाने याबाबत माहिती दिली आहे. कोरोनाचे रुग्ण वाढताच रुग्णालयांची आणि बेडची संख्या वाढवली जात आहे.