कोरोना रुग्णांमध्ये पुन्हा वाढ, चौथी लाट येणार? IIT प्राध्यापकांनी केला `हा` दावा
आयआयटी कानपूरचे प्राध्यापक मनिंद्र अग्रवाल यांनी कोरोनाच्या चौथ्या लाटेबाबत मोठा दावा केला आहे
Corona Update : देशात गेल्या काही दिवसात कोविड (Covid-19) प्रकरणांमध्ये वाढ झाल्याने कोरोनाची (Corona) चौथी लाट येण्याची शक्यता बळावली आहे. अशा परिस्थितीत अनेक जण अनेक अंदाज बांधत आहेत. त्याचवेळी आयआयटी कानपूरचे (IIT Kanpur) प्रोफेसर मनिंद्र अग्रवाल (professor manindra agarwal) यांनी चौथ्या लाटेबाबत मोठा दावा केला आहे.
या कारणाने कोरोना प्रकरणात वाढ
देशात अनेक ठिकाणी कोरोनाचे निर्बंध हटवण्यात आले आहेत. त्यामुळे कोरोना प्रकरणांमध्ये वाढ होणं हे स्वाभाविक आहे. शाळा कॉलेजही पूर्ण क्षमतेने सुरु झाल्या आहेत. त्यामुळे संसर्गाचं प्रमाण काही प्रमाणात वाढलं आहे. असं असलं तरी एक किंवा दोन आठवड्यांनंतर संसर्गाचं प्रमाण कमी होईल असं प्राध्यापक अग्रवाल यांनी म्हटलं आहे.
कोरोनाची चौथी लाट येणार?
गणितीय मॉडेल्सच्या आधारे आतापर्यंत कोरोना संसर्गाचे अचूक आकलन करणारे प्राध्यापक मनिंद्र अग्रवाल म्हणतात की चौथी लाट येण्याची शक्यता फारच कमी आहे. चौथी लाट आली तरी जीवघेणा ठरणार नाही. ते म्हणाले की, देशातील 90 टक्क्यांहून अधिक लोकांमध्ये कोरोनाविरुद्ध प्रतिकारशक्ती विकसित झाली आहे. असं असलं तरी लोकांनी मास्क लावून गर्दीच्या ठिकाणी जाण्याचं आवाहन त्यानी केलं आहे.