Coronavirus Vaccination : कोरोना लसीकरणात भारताने रचला इतिहास, एका दिवसात गाठला नवा उच्चांक
केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मंडावीया यांनी ट्वीट करत देशवासियांचं अभिनंदन केलं आहे
मुंबई : कोरोना संसर्गाविरूद्ध सुरू असलेल्या युद्धात भारताने आज एक नवं स्थान प्रस्तापित केलं आहे. आज दिवसभरात भारतात एक कोटीहून अधिक नागरिकांचं लसीकरण झालं. एका दिवसात आतापर्यंतचा हा उच्चांक असल्याची माहिती केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मंडावीया यांनी ट्वीट करत दिली आहे.
याआधी देशात एका दिवसात 1.09 कोटी लसीचे डोस देण्यात आले होते. पण आज हा टप्पा पार करत नवा उच्चांक गाठला आहे. आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांनी या यशाबद्दल आनंद व्यक्त केला असून देशातील नागरिकांचं अभिनंदन केलं आहे.
आरोग्यमंत्री मनसुख मडाविया म्हणाले, देशातील लसीकरणाच्या या विक्रमाचे श्रेय हे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या #SabkoVaccineMuftVaccine अभियानाला जातं. लसीकरणाचा मागचा विक्रम मोडत आज एक नवीन विक्रम स्थापित झाला आहे. आज देशात 1.09 कोटीपेक्षा जास्त लस देण्यात आली आहे आणि ही संख्या सतत वाढत आहे. सर्व देशवासियांचे अभिनंदन!
कोविन वेबसाईटच्या आकडेवारीनुसार देशात 65 कोटी 3 लाख 29 हजार 061 नागरिकांना लस देण्यात आली आहे. यापैकी 50 कोटी 12 लाख 44 हजार 655 नागरिकांना पहिला डोस देण्यात आला आहे. तर 14 कोटी 90 लाख 84 हजार 406 नागरिकांना कोरोनाचे दोन डोस देण्यात आले आहे.