CORONA VACCINE: कोरोनाविरुद्धच्या लढ्यात आणखी एक लस, 90 टक्के प्रभावी असल्याचा दावा
आता आणखी एका कंपनीची लस लवकरच उपलब्ध होणार आहे.
मुंबई : गेल्या दीड ते दोन वर्षांपासून जगभरात कोरोनाचा उद्रेक सुरु आहे. लाखो लोकांना कोरोनामुळे प्राण गमवावे लागले आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जगभरातून मोठ्या प्रमाणावर प्रयत्न केले जात आहेत. भारतासह काही देशांनी कोरोनावरील लस तयार केल्या आहेत. आता आणखी एका कंपनीची लस लवकरच उपलब्ध होणार आहे.
नोवावॅक्स (Novavax)कंपनीने त्यांची कोरोनावरची लस 90 टक्के प्रभावी असल्याचा दावा केला आहे. अमेरिकेत झालेल्या तिसऱ्या टप्प्याच्या चाचणीनंतर नोवावॅक्स (Novavax)कंपनीने हे जाहीर केलं आहे. तिसऱ्या टप्प्यात 30 हजार रुग्णांवर लसीची चाचणी करण्यात आली आहे.
बिल गेट्स यांनीही या लशीला आर्थिक सहाय्य केलं होतं. मात्र ट्रायल्स रखडल्याने ही लस इतर लशींच्या स्पर्धेत थोडी मागे पडली होती. पण आता लवकरच ही लस बाजारात उतरवण्याची योजना असून लसीची कार्यक्षमता 90.4 टक्के इतकी आहे.
सप्टेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत अमेरिका, युरोप आणि अन्य काही देशांमध्ये लस वितरीत करण्यासाठी मंजूरी मिळवण्याची योजना असून महिन्याला 10 कोटी लस उत्पादित करण्याचा कंपनीचा प्रयत्न आहे. गंभीर लक्षणं असलेल्या रुग्णांवर ही लस 90 टक्के प्रभावी असून हलक्या स्वरुपाची लक्षणं असणाऱ्यांवर लस 100 टक्के प्रभावी असल्याचा दावा कंपनीने केला आहे.
नोवावॅक्स (Novavax) कंपनीने सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियासोबत कोविड 19 लस उत्पादन करार केला आहे. सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया 2021 मध्ये NVX-CoV2373 चे एक अब्ज डोस तयार करणार आहे. सीरम इन्स्टिट्यूट या लशीतील अँटिजन घटक तयार करणार आहे.