नवी दिल्ली : कोरोना व्हायरसच्या संकटात स्वातंत्र्य दिन साजरा करण्याबाबत केंद्रीय गृहमंत्रालयाकडून मार्गदर्शक सूचना जाहीर करण्यात आल्या आहेत. राज्य सरकार, केंद्र शासित प्रदेश, सरकारी कार्यालय आणि राज्यपालांना ही मार्गदर्शक सूचना पाठवण्यात आल्या आहेत. १५ ऑगस्टला सार्वजनिक कार्यक्रमांचं आयोजन करू नये, असा सल्ला या सूचनेतून देण्यात आला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गृहमंत्रालयाच्या या मार्गदर्शक सूचनांमध्ये टेक्नोलॉजीचा वापर करायला सांगण्यात आलं आहे. कोरोना व्हायरसचं संक्रमण वाढत असल्यामुळे गृहमंत्रालयाला या मार्गदर्शक सूचना जाहीर कराव्या लागल्या आहेत. 



कोरोना व्हायरसचा धोका लक्षात घेता मास्क लावणं, सॅनिटाझेशन आणि सोशल डिस्टन्सिंगचं पालन करणं अनिवार्य आहे. स्वातंत्र्य दिनी गर्दी होणार नाही, याकडे लक्ष द्यावं. त्याशिवाय केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने पहिल्यापासून दिलेल्या नियमांचं पालन करणंही गरजेचं आहे, असं गृहमंत्रालयाकडून सांगण्यात आलं आहे. 


डॉक्टर, आरोग्य कर्मचारी आणि सफाई कर्मचाऱ्यांचा स्वातंत्र्य दिनी सन्मान करण्यासाठी त्यांना आमंत्रण द्या. कोरोनाविरुद्धची लढाई जिंकलेल्या रुग्णांनाही कार्यक्रमासाठी बोलवा, असा सल्लाही केंद्रीय गृहमंत्रालयाकडून राज्य सरकारांना देण्यात आला आहे.