नवी दिल्ली : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात लॉकडाऊन आहे. लॉकडाऊनमुळे गरीब आणि मजूरांसमोर मोठं संकट उभं राहिलं आहे. हातावर पोट असणाऱ्यांसाठी जेवणं, राहणं या साऱ्याचंच संकट आलं आहे. त्यामुळे अनेक मजूर शेकडो किलोमीटर पायीच प्रवास करत आपल्या गावी निघाले आहेत. काही मजूर लॉकडाऊनमुळे अडकले आहेत. त्यांना खाण्या-पिण्याची मोठी समस्या निर्माण होत आहे. कारखाने, फॅक्टरी बंद आहेत. त्यामुळे मजूर कित्येक किलोमीटरचं अंतर पायीच कापत आपल्या घरी जात आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अशातच छत्तीसगडमध्ये मजूरी करण्याऱ्या उत्तर प्रदेशातील एका मुलाची कहाणी समोर आली आहे. त्या मुलाच्या या हतबलतेने त्याच्यावर कोसळलेल्या संकटाचा आपण केवळ अंदाजच लावू शकतो. उत्तरप्रदेशमधील बनारसमध्ये राहणारा मुलगा, छत्तीसगढमधील रायपूरमध्ये मजूरीचं काम करतो. गेल्या 25 मार्च रोजी त्याच्या आईचं निधन झालं. पण लॉकडाऊनमुळे तो आईच्या अंतिम संस्कारासाठीदेखील पोहचू शकला नाही.


अशा परिस्थितीतही त्याने घरी जाण्याचं ठरवलं आणि त्याच्या दोन मित्रांसोबत तो रायपूरमधून बनारसकडे पायी चालत निघाला. तीन दिवसांत तो केवळ रायपूर ते कोरिया जिल्ह्यातील बैकुंठपूरपर्यंत पोहचू शकला आहे. 



त्याच्या एका मित्राने, आम्ही जवळपास 20 किलोमीटरपर्यंत पायी चाललो आहे. त्यानंतर 2-3 लोकांनी रस्त्यात लीफ्ट दिली. त्यानंतर बैकुंठपूर येथे पोहचल्यानंतर एका मेडिकल दुकानदाराने आमची मदत केली. आम्हाला खायला दिलं, आता आम्हाला पुढचा मार्ग गाठायचा आहे, असं सांगितलं.



देशभरात लॉकडाऊनमुळे अनेक कंपन्या, कारखाने, फॅक्टरी बंद झाल्या आहेत. त्यामुळे रोजंदारीवर काम करण्याऱ्यांपुढे मोठं संकट उभं राहिलं आहे. मुंबईत राहणं परवड नसल्याने अनेक मजूरांनी आपल्या गावची वाट धरली आहे. इतर शहरांमध्ये अडकलेले मजूरही, वाहतूक बंद असल्याने पायीच आपल्या गावी जात असल्याचं चित्र आहे.