नवी दिल्ली : कोरोना व्हायरसने देशभरात थैमान घातलं आहे. त्यातच आता संपूर्ण देशात सुरू असलेल्या लॉकडाऊनबाबत नवीन माहिती समोर आली आहे. बीजेडी नेते पिनाकी मिश्रा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर लॉकडाऊनबाबत प्रतिक्रिया दिली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'१४ एप्रिलला एकाच वेळी लॉकडाऊन उठवला जाणार नाही, हे मोदींनी स्पष्ट केलं आहे. कोरोनाच्या आधी आणि कोरोनानंतरच्या गोष्टी एकसारख्या नसतील. मोदींनी १४ एप्रिलनंतरही लॉकडाऊन वाढवण्याचे संकेत दिले. राज्यांनी आणि तज्ज्ञांनी हा लॉकडाऊन वाढवण्याचा सल्ला दिल्याचं मोदींनी सांगितलं,' असं पिनाकी मिश्रा म्हणाले.


कोरोनाच्या संकटामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून सर्वपक्षीय बैठक घेतली. या बैठकीला काँग्रेसकडून अधीर रंजन चौधरी, गुलाम नबी आझाद, राष्ट्रवादीचे शरद पवार, शिवसेनेचे संजय राऊत, तृणमूल काँग्रेसचे सुदीप बंडोपाध्याय, बसपाचे सतीश चंद्र मिश्रा, द्रमुकचे के टी आर बालू, बीजेडीचे पिनाकी मिश्रा, वायएसआर काँग्रेसचे मिथुन रेड्डी, सपाचे राम गोपााल यादव, जेडीयूचे राजीव रंजन सिंग, लोजपाचे चिराग पासवान, अकाली दलाचे सुखवीर सिंग बादल उपस्थित होते. ज्या पक्षाचे ५ पेक्षा जास्त खासदार आहेत, त्यांच्यासोबत पंतप्रधानांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संवाद साधला.


केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या आकडेवारीनुसार देशात कोरोनामुळे १४९ जणांचा मृत्यू झाला आहे. ५१९४ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. कोरोना व्हायरसमुळे करण्यात आलेल्या लॉकडाऊनचा हा तिसरा आठवडा आहे. कोरोनाच्या रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढत चालला आहे.


२४ मार्चला २१ दिवसांच्या लॉकडाऊनला सुरुवात झाल्यानंतर पंतप्रधानांनी पहिल्यांदाच विरोधकांसोबत संवाद साधला आहे. मोदींनी २ एप्रिलला देशाच्या सगळ्या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली होती. काहीच दिवसांपूर्वी पंतप्रधानांनी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी, तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्ष ममता बॅनर्जी, द्रमुकचे प्रमुख स्टालिन यांच्यासोबतही चर्चा केली होती. मोदींनी माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील, प्रणब मुखर्जी, आणि माजी पंतप्रधान एचडी देवेगौडा आणि मनमोहन सिंग यांनाही देशातल्या परिस्थितीची माहिती दिली.